मानवी रक्ताची चटक लागलेल्या ‘सीटी १’ या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभाग मागील तीन दिवसांपासून जीवाचे रान करीत आहे. इंदोरा जंगलात ठिकठिकाणी मचाण उभारून वाघावर पहारा ठेवला जात आहे. वाघ टप्प्यात यावा म्हणून जंगलात वगार बांधून ठेवली होती. बुधवारी रात्री ७ वाजताच्या दरम्यान वाघ आला आणि वगारीवर हल्ला करून घेऊनही गेला. मात्र, रात्रीची वेळ असल्याने नियमानुसार बेशुद्धीचे इंजेक्शन मारता आले नाही. टप्प्यात वाघ येऊनही नेमबाज बघतच राहिले.

हेही वाचा >>> भंडारा : वृध्द दाम्पत्याने दिला आज सायंकाळी आत्मदहन करण्याचा इशारा, पत्र मिळताच तहसीलदार संपर्क क्षेत्राच्या बाहेर

लाखांदूर तालुक्यातील इंदोरा जंगलात विनय मंडल (रा. अरुणनगर) या मासेमाऱ्याची सीटी-१ वाघाने शिकार केली होती. यानंतर वनविभागासह तालुक्यात एकच खळबळ उडाली. वाघाला जेरबंद करण्यासाठी तीन जिल्ह्यांतील शीघ्रकृती दलाचे पथक आणि नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे पथक दाखल झाले. त्यात प्रत्येक पथकात दोन नेमबाजांचाही समावेश आहे. जंगलात ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. मचाणावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. वाघाला आकर्षित करण्यासाठी जंगलात वगार बांधण्यात आली होती. वाघ टप्प्यात आली की, त्याला बेशुद्धीचे इंजेक्शन मारून जेरबंद करण्याचा प्रयत्नात सर्व वन कर्मचारी होते. मात्र, अंधाराचा फायदा घेत वाघाने बांधून ठेवलेली वगार फरफटत नेली.

हेही वाचा >>> दमदार पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भाची पाण्याची चिंता मिटली

मचाणावरील नेमबाजाला हे सारे दिसत होते. मात्र, रात्रीची वेळ असल्याने शासन निर्देशानुसार वाघाला बेशुद्धीचे इंजेक्शन मारता आले नाही, अशी माहिती आहे. गुरुवारी दिवसभर या प्रकारची चर्चा तालुक्यात होती. आता वाघ कधी जेरबंद होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, शुक्रवारी दुपारी १२.४५ वाजता मुंडिपार मार्गाने जाणाऱ्या एका दुचाकी चालकाला समोरच वाघ दिसला. याची माहिती नवेगाव नागझिरा वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर बराच वेळ या मार्गावर ट्रॅफिक जाम होता.

Story img Loader