नागपूर : राज्याच्या वनमंत्र्यांनी अलीकडेच नागपूर दौऱ्यात वणव्याचे प्रमाण कमी झाल्याचे सांगितले होते. परंतु, भारतीय वनसर्वेक्षणाची समोर आलेली आकडेवारी मात्र महाराष्ट्रात यावर्षी जंगलातील आगींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दर्शवत आहे.

राज्यात एक जानेवारी ते सात एप्रिल २०२५ या कालावधीत सुमारे एक हजाराहून अधिक आगीच्या घटनांची नोंद झाली. राज्यात यंदा लवकर सुरू झालेला उन्हाळा आणि तापमानात झपाट्याने होणारी वाढ देखील वणव्याच्या वाढत्या घटनांसाठी कारणीभूत मानली जात आहेत.

भारतीय वनसर्वेक्षणाने उपग्रहाच्या माध्यमातून दिलेली आकडेवारी मोठी आहे. २०२४ मध्ये याच कालावधीत नोंदवलेल्या ५१५ जंगलातील आगींच्या तुलनेत २०२५ मध्ये लागलेल्या आगीची संख्या जवळजवळ दुप्पट आहे. ज्यामुळे भारतातील वणव्यांमध्ये महाराष्ट्र मध्यप्रदेशनंतर दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. छत्तीसगड तिसऱ्या क्रमांकावर आहे.

महाराष्ट्रात फेब्रुवारीपर्यंत ९७ मोठ्या आगीच्या घटनांची नोंद झाली. त्यानंतर म्हणजेच मार्च महिन्यात एक हजाराहून अधिक आगीच्या घटना घडल्या. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात ११८ आगीच्या घटनांची नोंद करण्यात आली. वणव्याचा सामना करण्यासाठी राज्याच्या वनखात्याने आगप्रवण क्षेत्रांचे निरीक्षण करण्यासाठी जीआयएसवर आधारित पोर्टल सुरू केले आहे. वणव्याचे अंदाज आणि प्रतिबंध घालण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात आहे.

कठोर कारवाईचा इशारा

जंगलात आग लावणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा वनखात्याने दिला आहे. तसेच आगीशी संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देणाऱ्या किंवा त्यात सहभागी असलेल्या विक्रेत्यांचे परवाने रद्द केले जात आहेत.

वणव्याची संख्या

१ जानेवारीपासून राज्यात जंगलातील आगीच्या इशाऱ्यांची संख्या १४ हजार १०६ वर पोहोचली आहे. तर देशात ११ हजार ९०८ घटनांची नोंद झाली. मध्यप्रदेशात १७४३, महाराष्ट्रात १२४५, तर छत्तीसगडमध्ये १०४५ आगीच्या घटनांची नोंद आहे.

९९ टक्के आग मानवनिर्मित !

जंगलाला लागणारी ९९ टक्के आग मानवनिर्मित आहे. अधिकाधिक, आणि चांगला तेंदू व मोहफुले मिळावी म्हणून झाडाखाली गावकरी आग लावतात. ही आग पसरून त्याचे वणव्यात रूपांतर होते. उन्हाळ्यात जमिनीतील ओलावा कमी होतो व वाळलेल्या गवताचे प्रमाण अधिक असते. यामुळे जंगलात ठिणगी पडली तरी वणवा पेटतो.

तज्ज्ञांचे मत काय?

यावर्षी जाळरेषा व वणवा प्रतिबंधक कामे वेळेत होऊनही वणव्याची संख्या वाढली आहे. वनमजूर, वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकारी काम करत आहेत, पण घटना मोठ्या आणि अधिक असल्यामुळे त्यांच्यावरही तणाव आहे. त्यामुळे भविष्यातील वणव्याची व्याप्ती लक्षात घेता वणवा नियंत्रित करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आगीपासून वाचवणारा गणवेश आणि अत्याधुनिक यंत्रसामग्रीसह प्रशिक्षण देखील आवश्यक आहे. – यादव तरटे पाटील, माजी सदस्य राज्य वन्यजीव मंडळ.