नागपूर : भाजी घेण्यासाठी आईसोबत बाजारात जात असलेल्या तरुणीच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिली. यात मायलेकी गंभीर जखमी झाल्या. मात्र, मुलीचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना बुधवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास तुकडोजी पुतळा चौकात घडली. डोळ्यासमोरच एकुलत्या एक मुलीचा मृत्यू पाहून आईला मोठा आघात बसला आहे. अश्लेषा सुनील ठेंबरे (२०) रा. चंद्रमणीनगर, अजनी असे मृत तरुणीचे नाव आहे. आई वर्षा सुनील ठेंबरे (४७) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बुधवारी सायंकाळी अश्लेषा दुचाकीने आई वर्षा हिच्यासोबत बाजारात भाजी घेण्यासाठी जात होती. तुकडोजी पुतळा चौकातून सक्करदराकडे वळताना समोरून भरधाव आलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, अश्लेषा व तिची आई दोघीही खाली फेकल्या गेल्या. डोक्याला मार लागल्याने अश्लेषाचा घटनास्थळावरच मृत्यू झाला, तर वर्षा यांच्या पायावरून ट्रकचे चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. या अपघातामुळे घटनास्थळी तणाव निर्माण झाला. संतप्त नागरिक पकडून मारतील त्यापूर्वीच चालक ट्रक सोडून पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच अजनी पोलीस घटनास्थळावर पोहोचले. नागरिकांच्या मदतीने मायलेकीला उपचारार्थ मेडिकल रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून अश्लेषाला मृत घोषित केले. आई वर्षा यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपी ट्रक चालकावर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. अश्लेषा ही प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती. तिचे वडील सुनील हे हिंगणा मार्गावरील एका वाहतूक कंपनीत काम करतात. वर्षा आणि सुनीलची अश्लेषा ही एकुलती एक मुलगी होती. मुलगी शिकून मोठी होईल असे ठेंबरे दाम्पत्याचे स्वप्न होते. मात्र एका क्षणात त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. पोलिसांनी वडील सुनील यांच्या तक्रारीवरून आरोपी ट्रक चालकावर गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे. .