मोठ्या थाटात साक्षगंध सोहळा पार पडल्यानंतर उच्चशिक्षित वर आणि वधुला लग्नसोहळ्याचे वेध लागले. विवाह सोहळ्याची तारीख जवळ आली. वधू आणि वर पक्षाकडील खरेदी आणि लग्नाची तयारी झाली. लग्न तोंडावर असताना नवरदेव ‘बुलेट’साठी रुसला. त्याने इच्छा पूर्ण न केल्यास लग्न मोडण्याची धमकी दिली. नवरदेवाचा तोरा बघता वधूने हुंडा मागितल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी वरपक्षाकडील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून नवरदेव व त्याच्या वडिलांना ताब्यात घेतले.
हेही वाचा- नागपूर : ३० ट्रकचा मालक, करोनात डबघाईस आला, नुकसान भरून काढण्यासाठी…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नवरदेव सागर कवडू महाकाळकर (२४, बुटीबोरी) आणि राजीवनगरमध्ये राहणारी स्विटी (काल्पनिक नाव) हे दोघेही उच्चशिक्षित आहेत. सागरचा दुधाचा व्यवसाय आहे तर घरी चांगली शेती आहे. दोघांचाही कुटुंबियांच्या सहमतीने विवाह ठरला. रितिरिवाजनुसार ३ नोव्हेंबर २०२२ ला साक्षगंध सोहळा पार पडला. २ फेब्रुवारी २०२३ ही लग्नाची तारीख ठरली होती. सर्व नातेवाईकांना अक्षदा-पत्रिका पोहचल्या. मात्र, लग्नाच्या आठवड्याभरापूर्वी २६ जानेवारी २०२३ला मुलाच्या वडिलांनी मुलीकडे फोन करून मुलाने ‘बुलेट’मोटरसायकल व २ लाख रुपये हुंडा देण्याची मागणी केली. त्यानंतर याबाबत समझोता करण्यासाठी नातेवाईक एकत्र आले. पण, मुलाकडील मंडळी ऐकाला तयार नव्हती. बुलेट आणि हुंडा न दिल्यास लग्नात हजर राहणार नाही, अशी धमकी नवरदेव आणि त्याच्या वडिलांनी दिली.
हेही वाचा- घृणास्पद! स्वत:च्या दोन मुलींवर बापाचा अत्याचार; नराधमाला दुहेरी जन्मठेप
२ फेब्रुवारीला लग्नाचा दिवस उजाळला. वधूपित्याने लग्नाची तयारी केली. मात्र, लग्नाच्या दिवशीही नवरदेव आलाच नाही. यामुळे स्विटीने आईवडिलांसह एमआयडीसी पोलीस ठाण्यात हुंडा मागून लग्न मोडल्याप्रकरणी तक्रार दिली. ठाणेदार भीमा नरके यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ताबडतोब गुन्हा दाखल केला आणि नवरदेव सागर आणि त्याचे वडील कवडू महाकाळकर यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी कारवाई करताच सागरचे अन्य नातेवाईक फरार झाले.