नागपूर : नागपूर जिल्ह्यात संत्री लागवडीचे तालुके अशी ओळख असलेल्या काटोल व नरखेड तालुक्यात जमिनीतील पाण्याची पातळी सूमारे आठशे फुटांपेक्षा अधिक खोल गेली आहे. त्याचा फटका संत्री उत्पादनाला बसण्याची शक्यता आहे.
यंदा मार्च पासूनच उन्हाळा जोरात तापू लागला आहे. एप्रिल महिन्यात तथा तापमान ४५ अंशांपर्यंत गेले. संत्री उत्पादनासाठी मुबलक पाण्याची आवश्यकता भासते. त्यामुळे जमिनीतून बोअरवेल व्दारे पाण्याचा उपसा केला जातो. त्यामुळे जलस्तर खाली जातो. काटोल आणि नरखेड तालुक्यात हेच झाले. हा डार्क झोन घोषित करण्यात आला.
या भागातील पाणी टंचाई बाबत शुक्रवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा बैठक घेतली. . या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्याला मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता आहे. याला काटोल आणि नरखेड तालुक्यातील काही गावे अपवाद आहेत. या तालुक्यात ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची दूर्भिक्षता आहे अशी गावे जिल्हा प्रशासनामार्फत निश्चित केली आहेत. या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची उपलब्धता तत्परतेने करा, असे निर्देश बावनकुळे यांनी जिल्हा प्रशासनास दिले.
पाणी टंचाईअंतर्गत ज्या काही उपाय योजना शासनाने सूचवल्या आहेत त्यावर भर देऊन पाणी वाटपाचे सुयोग्य नियोजनकरा, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
कंत्राटी कामगारांसाठी घरे
कोराडी आणि खापरखेडा वीज प्रकल्पातील कंत्राटी कामगारांसाठी पंतप्रधान आवास योजनेतून पाच हजार घरे बांधणार असल्याचे बावनकुळे यांनी बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कामगारांसाठी भिलगाव ,खैरीजवळ हे बांधकाम सुरू आहे. तसेच सध्या तयार असलेली घरे लवकरच वाटप केली जाणार असे बावनकुळे म्हणाले.
म्हाडा इमारतीचा पुनर्विकास
नागपूर शहरांतील हिस्लाप कॉलेजच्या जवळ असलेल्या म्हाडाच्या वसाहतीचा लवकरच पुनर्विकास केला जाईल,असे त्यांनी सांगितले. येथील अतिक्रमण काढण्याचा दावाही त्यांनी केला.