नागपूर : अंबाझरी तलावाजवळ सुरू असलेल्या विकास कार्यामुळे शहरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर व्हीएनआयटीचा मार्ग वाहतूकीसाठी सुरू करण्याबाबत प्रयत्न करण्यासाठी उच्च न्यायालयाने सल्ला दिला होता. मात्र, व्हीएनआयटीने याला स्पष्ट नकार दिल्यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. व्हीएनआयटीचा मार्ग मोकळा करण्यासाठी शासकीय ‘शक्ती’ चा वापर करा, विशेषाधिकार वापरा, असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

अंबाझरी तलाव परिसरातील पुलाचे बांधकाम सुरू असल्याने अंबाझरी टी-पॉईंट ते विवेकानंद स्मारकापर्यंत दोन्ही बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे सुभाषनगरकडून बर्डी तसेच बर्डीकडून सुभाषनगरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना लांब फेरा मारावा लागतो. परिणामी, माटे चौक, अभ्यंकरनगर चौक, एलएडी चौक यासह संपूर्ण परिसरात वाहतुकीचा खोळंबा होता. यात रुग्णवाहिकेसह अनेक वाहनचालक तासनतास अडकतात. यावर पर्याय म्हणून व्हीएनआयटीचा मार्ग सुरू करण्याचे मौखिक आदेश न्यायालयाने दिले होते. याबाबत विभागीय आयुक्तांनी स्वत: पुढाकार घेण्याच्या सूचनाही न्यायालयाने केल्या होत्या. प्रशासनाने याप्रकरणी व्हीएनआयटीला प्रस्ताव दिला. मात्र, व्हीएनआयटीच्या वतीने हा प्रस्ताव अमान्य करण्यात आला. याबाबत बुधवारी प्रशासनाने उच्च न्यायालयात माहिती दिली. यानंतर न्यायालयाने प्रशासनाला खडेबोल सुनावले. ते नकार देतात आणि तुम्ही ऐकून घेता? तुम्ही शक्तीहीन आहात काय? तुम्हाला तुमचे विशेषाधिकार माहित नाही का? असे प्रश्न न्यायालयाने विचारले. व्हीएनआयटीचा मार्ग सुरू करण्यासाठी शक्तीचा वापर करा आणि तुम्हाला तुमची शक्ती कशी वापरायची आहे, याबाबत तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे, असे न्यायालय म्हणाले.

हेही वाचा >>>देखणा बिबट्याही ‘हिट अँड रन’चा बळी…पलीकडे जाण्यासाठी रस्त्यावर आला आणि…

एकेरी वाहतूकीचा पर्याय

व्हीएनआयटीकडे दिलेल्या प्रस्तावात प्रशासनाने विविध पर्याय सुचविले होते. यामध्ये एकेरी वाहतूक सुरू करणे तसेच केवळ दुचाकींना प्रवेश देणे यासारख्या पर्यायांचा समावेश होता. याशिवाय सकाळी ३ तास आणि सायंकाळी ३ तास रस्ता सुरू करा, असा पर्यायही प्रशासनाने ‘व्हीएनआयटी’ला दिला होता. मात्र, व्हीएनआयटी प्रशासनाने एकही पर्याय स्वीकारला नाही. न्यायालयाने व्हीएनआयटीच्या या भूमिकेवर प्रचंड नाराजी व्यक्त केली. तुम्हाला काही कायमचा रस्ता सुरू करायचा नाही आहे. पुलाचे बांधकाम होईपर्यंत ही तात्पुरती व्यवस्था राहणार आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा विचार करून काही काळापुरता मार्ग मोकळा करा, अशा शब्दात न्यायालयाने व्हीएनआयटीला खडसावले.

ही नैसर्गिक आपदा नाही

पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे वाहतूकीचा खोळंबा होत आहे, याची आम्हाला जाणीव आहे. मात्र, ही नैसर्गिक आपदा नसून मानवनिर्मित परिस्थिती आहे, अशी भूमिका व्हीएनआयटीने न्यायालयात दाखल शपथपत्रात मांडली. व्हीएनआयटीच्या परिसरात पाच हजाराहून अधिक विद्यार्थी राहतात. त्यामुळे आतमधील रस्ते दुचाकीसाठी उघडणे कठीण आहे. व्हीएनआयटीमधून रुग्णवाहिकांना जाऊ देण्याबाबत आमचा आक्षेप नाही. मात्र वाहतूकीसाठी हा रस्ता सुरू करणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे, असेही व्हीएनआयटीच्या वतीने सांगण्यात आले.