नागपूर : राज्य सरकारच्या आश्वासनानंतर धनगर समाजाचे उपोषण आंदोलन मागे घेतले आहे, तर आता आदिवासी नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषणाला बसले आहेत. ‘संयुक्त आदिवासी कृती समिती’ या एका बॅनरखाली हे आंदोलन आजपासून सुरू झाले.
हेही वाचा – गोंदिया : नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान विकासापासून वंचित; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
महाराष्ट्रातील आदिवासींच्या (अनुसूचित जमाती) आरक्षणामध्ये धनगर अथवा इतर कोणत्याही जातीचा समावेश करू नये. गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालय सुराबर्डी नागपूर येथे कायम ठेवावे, कंत्राटी पद भरती रद्द करण्यात यावी, अनुसूचित जमाती युवकांसाठी विशेष पद भरती करण्यात यावी. या व इतर प्रमुख मागण्यांसाठी आदिवासी समाजाच्या सर्व सामाजिक संघटना आंदोलन करीत आहेत.