यवतमाळ : अवैध सावकारीची पाळेमुळे उखडून टाकण्याची घोषणा शासनाने केल्यानंतरही सर्वत्र अवैध सावकारी जोरात सुरूच आहे. याची प्रचिती यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे आली. अवैध सावकारी पथकाने पुसद येथे एका व्यावसायिकाच्या घरी आणि प्रतिष्ठानावर एकाचवेळी धाड टाकून महत्वाचा दस्तऐवज ताब्यात घेतला. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पुसद जिल्हा निबंधक (सावकारी) यवतमाळ यांच्या आदेशान्वये सावकारी झडती पथकाने शुक्रवारी ही कारवाई करत महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमानुसार अनिल मधुकर गडम, रा. मामा चौक, पुसद यांचे राहते घर व सुभाष चौक पुसद येथील किराणा दुकानाची झडती घेतली.
या कारवाई दरम्यान गडम यांचे घर व दुकानातून अवैध सावकारी संबधाने कागदपत्रे, दस्तऐवज, धनादेश, नोंदी असलेली डायरी जप्त करण्यात आली. वैभव गोधाजी बोरकुट रा.लोणी ता. पुसद यांनी १७ मार्च रोजी या सावकाराविरोधात जिल्हा निबंधक यवतमाळ यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये अनिल गडम हे बेकायदेशीर सावकारी करीत असून अवैध सावकारीच्या व्यवहारात शेत जमिनीचे खरेदीखत लिहून घेतले. ते रद्द करुन मिळणे व त्यांच्याविरुध्द फौजदारी कारवाई करण्याची विनंती तक्रारदाराने विनंती केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने सावकार विरोधी पथकाने अनिल गडम यांच्या घरात व किराणा दुकानात झडती घेतली. या कारवाई दरम्यान कोरे बाँड, कोरे धनादेश, खरेदीखत, नोंदी असलेल्या डायऱ्या, चिठ्या असे एकूण ५८ कागदपत्रे, दस्त जप्त करण्यात आले आहेत.
कागदपत्रे व दस्तांची पडताळणी करुन महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील तरतुदीनुसार कार्यवाही प्रस्तावित करण्यात येणार आहे. ही कारवाई जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ नानासाहेब चव्हाण यांच्या नेतृत्वात दोन पथकांनी केली. दिग्रस येथील सहाय्यक निबंधक केशव मस्के, पुसद येथील सहाय्यक निबंधक सुनिल भालेराव यांच्यासह सहकार अधिकारी अनिल सुरपाम, संजय पिंपरखेडे, जि.पी.राठोड, सविता चांदेकर, चेतन राठोड,अमोल आदींसह वसंत नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण, विमल डवरे, अविनाश राठोड जमादार, सुजाता नरवाडे आदींनी केली. या कारवाईमुळे जिल्ह्यात अवैध सावकारी राजरोसपणे सुरू असल्याचे स्पष्ट झाले. त्या विरोधात क्वचित तक्रार होत असल्याने कारवायासुद्धा नगण्य होत आहे.