चंद्रपूर : प्रेयसीवर पेट्रोल टाकून प्रियकराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी मूलमध्ये घडली. गळफास लावून आत्महत्या करणाऱ्या प्रियकराचे नाव बंडू उर्फ रामचंद्र निमगडे ( ४५) आहे. मुल शहरातील वार्ड क्र. ११ मध्ये तो वास्तव्याला होता.
बंडू विवाहित असून त्याच्यामागे पत्नी व एक मुलगा आहे. बंडूचे शेजारीच राहणाऱ्या एका विवाहितेशी बऱ्याच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. बंडू व त्याची प्रेयसी या दोघांनाही एक एक मुलगा असून यांच्या प्रेमसंबंधाची नेहमीच चर्चा व्हायची. त्यामुळे बंडूचे घरी पत्नीसोबत नेहमी भांडणे व्हायची.
हेही वाचा – ‘समृद्धी’वर महिनाभरात ५५० वाहनांवर कारवाई; २ हजार २५७ वाहनचालकांना सक्तीने समुपदेशन
बंडू सोमवारी दुपारी शेजारी प्रेयसीच्या घरी गेला व तिच्या अंगावर पेट्रोल टाकले. तेथून तो घरी परत आला व घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. पेट्रोल टाकल्याने घाबरलेल्या प्रेयसीला पोलिसांनी रुग्णालयात नेले. तेथे तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला चंद्रपूर येथे पुढील उपचारार्थ हलविण्यात आले.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक यांनी भेट दिली. पेट्रोल टाकून हत्येचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी मृत बंडू निमगडे यांच्याविरुद्ध ३०७ चा गुन्हा दाखल केला असून आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास प्रभारी ठाणेदार बनसोड हे करीत आहेत.