लोकसत्ता टीम
नागपूर : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर इंडिया आघाडीचाच पंतप्रधान होईल, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. चार जूननंतर भाजप सत्तेतून बाहेर गेलेला दिसेल आणि इंडिया आघाडीचे सरकार येईल, विश्वास विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. विजय वडेट्टीवार नागपुरात बोलत होते. इंडिया आघाडीची मोठ बांधून आम्ही लढलो. आमच्या विरोधात अपप्रचार केला गेला. मात्र आम्ही लढलो आणि हे दाखवून दिले. आम्ही खोटारड्या सरकारच्या विरोधात लढलो, असे वडेट्टीवार म्हणाले.
इंडिया आघाडीत जी काही चर्चा होईल, त्या चर्चेमध्ये जे नाव पुढे येईल तो इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार असेल, मात्र राहुल गांधी यांच्या नावावर एकमत होईल, असा विश्वास आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी मदत केली असल्याचे निलेश राणे म्हणत असतील, मात्र निकालानंतर कळेल कोणी कोणाला मदत केली आहे. महाराष्ट्रात भाजपचा सुपडासाफ होईल. यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचाही समावेश आहे. राणे यांनी कितीही पैसे लावले असले तरी भाजप निवडून येणार नाही. भाजपच्या विरोधात लोकांनी मतदान केले आहे. त्यामुळे भाजप नेत्याच्या बोलण्यात तथ्य नसून महाराष्ट्रात भाजपपेक्षा पेक्षा जास्त जागा इंडिया आघाडी जिंकेल असेही वडेट्टीवार म्हणाले.
आणखी वाचा-गांधीबाबत मोदींच्या विधानाकडे दुर्लक्ष, काँग्रेस नेत्यांनी दिली ही कारणे
महादेव जानकर हे स्वतःच पराभूत होत आहे. कदाचित त्यांची वाट चुकली. ते जर आमच्या सोबत असते तर आज खासदार दिसले असते. दुर्दैवाने त्यांचा पाउल चुकले आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.सुनील तटकरे यांनाच विचारा पराभवानंतर ते कुठे जाणार आहे. आमचा तटकरेशी संबंध नाही, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणूक लढणार असेल तर स्वागत आहे. कोण किती जागा लढवाव्यात तो त्यांचा अधिकार आहे. जनता ठरवेल त्यांना कितपत साथ द्यायची. आताच्या राजकीय परिस्थितीमध्ये जे काही राजकीय पक्ष काम करत आहे तेच टिकतील. नवीन पक्ष काढून लढत असतील तर त्यांचे स्वागत आहे. आजच्या बैठकीत काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते येणार आहेत. दुष्काळासंदर्भात या बैठकीत चर्चा होईल. दुष्काळाची भयावहता सरकारच्या लक्षात आणून द्यायचे आहे असेही वडेट्टीवार म्हणाले.