नागपूर : अवकाळी पावसाने राज्याचीच नाही तर देशाची पाठ अजूनही सोडलेली नाही. एरवी मार्च महिना सुरु झाला की उन्हाच्या झळा असह्य व्हायला लागतात. येथे मात्र अवकाळी तर बरसतंच आहे, पण या अवकाळी मुळे राज्याच्या काही भागात थंडीसुद्धा जाणवायला लागली आहे.

मार्च महिना सुरु होताच भारतीय हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज दिला आणि तो खराही ठरला. वादळी वाऱ्यासह आणि ढगांच्या गडगडाटासह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळाली. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशाच्या हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. डोंगराळ भागात सुरू असलेल्या बर्फवृष्टीचा देखील हवामानावर परिणाम होत आहे. अनेक भागात पावसाचा अंदाज कायम असून तापमानात घट झाली आहे. पहाटे आणि रात्री हलकी थंडी जाणवत आहे. भारतीय हवामान खात्याने आजदेखील विदर्भ, मराठवाड्यासह मध्य भारतात अवकाळी पावसाचा अंदाज दिला आहे.

हेही वाचा…१९ उद्योग कंपन्यांशी ७५ हजार कोटींचे सामंजस्य करार, ‘ॲडव्हांटेज चंद्रपूर २०२४- इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह’चे आयोजन

वादळी वाऱ्यासह गारपीटीचाही अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज नागपूरसह अमरावती, अकोला, बुलढाणा, परभणी, बीड, हिंगोलीसह पुण्यात अवकाळी पाऊस येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या पावसामुळे अनेक ठिकाणी तापमानात घट झाली आहे. हवेत गारठा असून थंडी जाणवू लागली आहे. यावर्षी हिवाळा जाणवेल अशी थंडी पडलीच नाही. अधूनमधून थंडी होती, पण हिवाळा आला कसा आणि गेला कसा हे कळलेच नाही. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान झाले. धान पिकवणारा शेतकरीच नाही तर फळबागाधारक सुद्धा संकटात सापडले आहेत. गारपीटीसह झालेल्या पावसामुळे अवघे पीक नाहीसे झाले. दरम्यान, आज राज्यासह अरुणाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडच्या अनेक भागात पावसाची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणाच्या अनेक भागांमध्ये देखील हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

Story img Loader