चंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर आणि परिसरातून गुरुवारी असंख्य लोकांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला अगदी डोक्यावरून उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना अनुभवले. संध्याकाळी ७ वाजून ३२ मिनिटांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक उत्तरेकडून दक्षिणेकडे ताशी २७००० किलोमीटर इतक्या वेगाने गेले. यावेळी त्याची उंची फक्त ४१३ किलोमीटर इतकीच होती. त्यामुळे तो शुक्रापेक्षाही जास्त तेजस्वी दिसत होता. तब्बल चार मिनिटांपर्यंत ते चंद्रपूरच्या आकाशात होते.
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक हा अमेरिकेची नासा, रशियाची रॉस कॉसमॉस, जपानची जाक्सा, युरोपियन स्पेस एजन्सी आणि कॅनडाची सीएसए या वेगवेगळ्या स्पेस एजन्सीची एकत्रित केलेली कृती आहे. याआधी अमेरिकेचे स्कायलॅब, रशियाचे मीर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नेहमीसाठी संपूर्ण जगाचेच सहकार्य घेऊन तयार करण्यात आलेला इंटरनॅशनल स्पेस स्टेशन तब्बल चार लाख ५० हजार किलोग्रॅमचा आहे. याचा कार्यकाळ कधीही संपणार नाही अशा पद्धतीने त्याची रचना केली आहे. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे तो जेव्हा खाली खेचला जातो तेव्हा नवीन मोटर्स लावून त्याची उंची पुन्हा वाढवण्यात येते, त्यामुळे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला रिटायर्ड हे नाव लावले जाणार नाही.
हेही वाचा – ताडोबात २०० पशु, पक्ष्यांचा आवाज काढणारा ‘बर्डमॅन’
हेही वाचा – रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे : नागपूर मार्गे धावणाऱ्या काही रेल्वे रद्द
याची लांबी १०९ मीटर आणि रुंदी ७३ मीटर इतकी मोठी आहे. १९९८ पासून थोड्या थोड्या तुकड्यांत रशिया आणि अमेरिका या देशांतून वेगवेगळे पुर्जे अवकाशात नेऊन त्याची निर्मिती करण्यात आली. अवकाश स्थानकावर झिरो ग्रॅव्हिटीचे अनेक प्रयोग करण्यात आले. अवकाश वीर या स्थानकात तब्बल सहा महिन्यांपर्यंत राहू शकतात. येथे पृथ्वीच्या वातावरणा इतका हवेचा दाब सतत निर्माण केला जातो. २१ टक्के ऑक्सिजन आणि ७८ टक्के नायट्रोजन सदा सर्वदा निर्माण केले जाते. इथे अनेक प्रयोग करण्यात येत आहेत. झिरो ग्रॅव्हिटीमध्ये एखादे गव्हाचे रोपटे कसे वाढू शकते, यावरसुद्धा प्रयोग करण्यात आले. एखाद्या फुटबॉलच्या मैदानाच्या आकाराचा हा स्पेस स्टेशन अवकाशातून जेव्हा जातो तेव्हा अत्यंत चमकदार असा प्रकाश पहावयास मिळतो. तेच आज चंद्रपूरकरांनी आणि विदर्भातील अनेक नागरिकांनी अनुभवले आहे, अशी माहिती येथील भूगोल अभ्यासक तथा स्काय वॉच ग्रुपचे डॉ. योगेश दुधपचारे यांनी दिली.