अकोला : अवकाळी पावसानंतर आकाशातील धुलीकणाचे प्रमाण कमी झाल्याने आकाश निरीक्षण अधिक स्पष्ट असते. ग्रह-ताऱ्यांसोबतच आकाशात विविध घडामोडी अधुनमधून अनुभवता येतात. अशातच या महिन्यात मिथुन राशीतून होणारा उल्का वर्षाव व अकोला, अमरावती, वाशीम, बुलढाणा जिल्ह्यात ६ ते ९ डिसेंबर या सलग चार दिवसांत संध्याकाळच्या सुमारास निरभ्र आकाशात फिरती चांदणी अर्थात आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राचा अनोखा थरार पाहता येईल. या खगोलीय घटनेचा आनंद घेण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी केले. अमेरिका, रशियासह पंधरा देशांच्या संयुक्त प्रयत्नातून अत्याधुनिक अंतराळ संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले. त्याद्वारे विविध देशांतील वैज्ञानिक अभ्यास व संशोधन कार्य सुरू असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : जिल्हा न्यायालयांत ४६२९ पदांसाठी भरती, ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

सुमारे फुटबॉलच्या मैदानापेक्षा दीडपट आकाराचे हे केंद्र पृथ्वीपासून साधारण चारशे किलोमीटर अंतरावरून सुमारे दीड तासात दरताशी २७ हजार ५०० कि.मी.या वेगाने फिरत असते. पृथ्वीवरुन ज्या भागावरुन याचा प्रवास होतो, तेव्हा त्या भागातील लोकांना या केंद्राचा फिरत्या चांदणीच्या स्वरुपात दर्शनाचा लाभ घेता येतो. स्थान परत्वे वेळ, दिशा व तेजस्वीतेत काही बदल होत असतो. ६ डिसेंबरला, बुधवारी सायंकाळी ७ वाजता तीन मिनिटे फिरत्या तेजस्वी चांदणीचा प्रवास वायव्य ते पूर्वेकडे गुरु ग्रहाचे जरा अलिकडे लुप्त होईल. दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.१२ ते ६.१८ यावेळी केंद्र उत्तरेकडून पूर्वेकडे जातांना दिसेल. शुक्रवारी पुन्हा सायंकाळी ७ वाजता फिरती चांदणी पश्चिम आकाशात दक्षिण दिशेला सरकताना पाहता येईल. शनिवारी सायंकाळी ६.११ वाजता वायव्येकडून आग्नेय दिशेला सुमारे सहा मिनिटे बघता येईल, अशी माहिती प्रभाकर दोड यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The international space station will pass through the districts of akola amravati washim buldhana ppd 88 css