वाशिम: शासन दप्तरी अकांशित आणि मागास जिल्हा म्हणून वाशिम जिल्ह्याची नोंद आहे. सिंचनाचा अनुशेष मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जिल्ह्यात सिंचन वाढीसाठी सुरू असलेल्या प्रकल्प कामांना गती देणे व नवीन प्रकल्पाची निर्मिती करणे गरजेचे असताना पाटबंधारे प्रकल्प मंडळ कार्यालय वाशिम येथून बुलढाणा येथे स्थलांतरित केले जात आहे. परिणामी जिल्ह्यातील नागरिकांना किरकोळ कामासाठी दोनशे किलो मिटर पायपीट करावी लागणार आहे.
जिल्ह्यातील पाणी टंचाई व दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन सन २००८ मध्ये वाशीम जिल्ह्यात मंडळ कार्यालयाची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे सिंचन क्षमता वाढीस मदत झाली. परंतु महाराष्ट्र शासन जल संपदा विभागाने २३ ऑक्टोंबर रोजी शासन निर्णय काढून मंडळ कार्यालय स्थलांतर करण्याचा शासन निर्णय काढला. ही बाब मागास आणि अकांक्षीत असलेल्या वाशीम जिल्ह्यासाठी अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा… सव्वा तास चंद्र पृथ्वीच्या छत्रछायेत, शनिवारी चंद्रग्रहण; जाणून घ्या केव्हा दिसणार..?
जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न गंभीर असल्याने जिल्हा परिषद सदस्या सरस्वती मोहन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली अनेक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन पाट बंधारे मंडळ बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे स्थलांतरित करू नये, अशी मागणी केली आहे.