शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणी खासगी शिकवणी वर्गांच्या उभ्या ठाकलेल्या भव्यदिव्य इमारतींमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेकडो विद्यार्थी एका शिकवणीमध्ये प्रवेश घेत असून गर्दीच्या ठिकाणी असणाऱ्या शिकवणी वर्गांवर शासनाचे कुठलेही धोरण किंवा नियम नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची हमी घेणार कोण? असा प्रश्न उपस्थित होते आहे.
हेही वाचा- नागपूर : विधिसभेतील पदवीधर मतदारसंघासाठी ५९ उमेदवार रिंगणात; विद्यापीठाकडून अंतिम यादी जाहीर
सुरुवातीच्या काळात अभ्यासात थोडा मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांला चांगले गुण मिळवण्यासाठी अधिकचा अभ्यास म्हणून शिकवणी ही संकल्पना होती. मात्र, आयआयटी, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या जेईई आणि नीट या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरू झाली. विद्यार्थ्यांचा लोंढा या परीक्षांकडे वाढल्याने शिकवणी वर्गांची संकल्पना बदलत गेली. परिणामी, आज गल्लीबोळात खासगी शिकवणी वर्गांनी आपली दुकानदारी थाटल्याचे दिसून येते. मात्र, या शिकवणी वर्गांच्या संदर्भात शासनाचे कुठलेही धोरण नसल्याने सुरक्षेच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शहराच्या मध्यभागी, व्यवसायिक दृष्टीने नफ्याच्या परिसरामध्ये शिकवणी वर्गांच्या इमारती उभ्या आहे. एका शिकवणी वर्गाच्या चार ते पाच इमारती शहराच्या विविध भागांमध्ये आहेत. येथे हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. शिकवणी सुटताच रस्त्याच्या दुतर्फा विद्यार्थ्यांच्या आणि त्यांची ने-आण करणाऱ्या गाड्याच्या रांगा लागतात. अगदी बाजारपेठांच्या परिसरात असणाऱ्या शिकवणी वर्गांमुळे अशा परिसरांमध्ये गर्दी वाढत असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, याकडे कुणाचेही लक्ष नाही. दुतर्फा उभ्या राहणाऱ्या गाड्यांमुळे रस्त्यावरील नागरिकांना मोठा त्रास होतोच. परंतु, शिवकणीच्या या गर्दीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
हेही वाचा- नागपूर : कुलगुरूंची नामुष्की, अवैध ठरवलेले अर्ज न्यायालयाकडून वैध
शाळा नियम, शिकवणी मोकाट
शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जेवढी विद्यार्थी संख्या असते तेवढीच संख्या या शिकवणी वर्गांमध्ये आहे. सुरक्षेचे नियम मात्र दोघांनाही वेगळे आहेत. शाळांना परवानगी देताना शासन तेथे विद्यार्थ्यांना बसण्याजोगी जागा आहे का, सर्व भौतिक सुविधा आहेत का, वाहनतळची सुविधा आहे का, सुरक्षेचे सर्व नियम पाळले जातात का, या सर्वांची पाहणी केली जाते. या आधारावरच शाळांना परवानगी मिळते. आज शाळांच्या तुलनेत अधिक विद्यार्थी शिकवणीमध्ये आहेत. शिकवणी वर्ग व्यवसाय करत असले तरी येथेही विद्यार्थीच शिक्षण घेत असल्याने सुरक्षेअभावी कुठला घातपात झाल्यास त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिकवणी वर्गांमध्ये याची पाहणी केली जाते का?
- विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत तेथे वाहनतळाची सुविधा आहे का?
- विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा आहेत का?
- सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना इमारतीमध्ये आहेत का?
- शिकवणी वर्गांबाहेर उभ्या राहणाऱ्या शेकडो वाहनांवर नियंत्रण असते का?
- विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काही उपाययोजना केल्या जातात का?
शाळांप्रमाणेच नियमांचे बंधन आवश्यक
खासगी शिकवणी वर्गांचे सध्याचे स्वरूप हे शाळांप्रमाणेच झाले आहे. त्यामुळे, या वर्गांकडे पुरेशा भौतिक सुविधा आहेत काय, हे तपासायला हवे. अशा वर्गांना सरकारने मान्यता द्यावी आणि त्यांची माहिती ठेवावी. खासगी शिकवणी वर्ग कसे चालवले जावेत, याचे नियम घालून देणारा कायदा सरकारने करावा, अशी मागणी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी केली.