वाशिम : लाखो रुपये खर्च करून वाहतूक व्यवस्था नियंत्रित ठेवण्यासाठी शहरातील चौकांत सिग्नल व्यवस्था नगर पालिकेने लावली. परंतु मागील अनेक वर्षांपासून सिग्नल व्यवस्था सुरूच झाली नाही. सध्या दिवाळीमुळे पाटणी चौकात वाहतुकीची कोंडी होत असल्याने नागरिकांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागत आहे. वाढती वाहतूक कोंडी सोडविण्याचे आव्हान शहर वाहतूक शाखेसमोर आहे.
वाशिम शहरातील पाटणी चौक हा मुख्य चौक आहे. याच चौकात मुख्य बाजारपेठ असल्याने दिवाळीमुळे खरेदीसाठी ग्रामीण भागातील नागरिकांसह शहरवासीयांची दररोजच गर्दी होते. यासोबतच इतरही चौकांत दररोज वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे शहरात सिग्नल व्यवस्थेची मागणी होत होती. त्याअनुषंगाने शहरातील पाटणी चौक, अकोला नाका, पुसद नाका, पोलीस स्टेशन चौक आणि आंबेडकर चौकात नगरपालिकेने लाखो रुपये खर्चून सिग्नल व्यवस्था लावण्यात आले होते. सुरवातीला काही दिवस सिग्नल लागलेले दिसून आले. परंतु वर्ष उलटून गेले तरी अद्यापही शहरातील कोणत्याच चौकात सिग्नल व्यवस्था सुरळीत सुरू झालेली नाही.
बहुतांश चौकात वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी काही ठराविक काळापर्यंतच दिसतात. काही रस्त्यावर दुभाजकच नसल्यामुळे शहर वाहतूक शाखेच्यावतीने लोखंडी बॅरीकेट्स लावण्यात आले आहेत. पाटणी चौकातून एक राज्य मार्ग जात असल्यामुळे जड वाहतुकीमुळेदेखील वाहतूक विस्कळीत होते. व्यापाऱ्याकडे जड वाहनातून आलेल्या मालाच्या गाड्यादेखील रस्त्याच्या कडेला उभ्या राहतात. दिवसेंदिवस शहरातील वाहतुकीची समस्या कमी होण्याएवजी जटील होत चालली आहे. यामुळे अनेकवेळा किरकोळ अपघतही होत आहेत. शहरात वाहतूक शाखेचे कर्मचारी नित्यनेमाने सेवा बजावित असले तरी बंद पडलेल्या सिग्नलमुळे कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा – वर्धा : जमनालाल बजाज संस्थेची दुर्बल शाळांना दहा कोटींची मदत
सिग्नल यंत्रणा कुचकामी!
शहरातील पाटणी चौकात लावण्यात आलेले सिग्नल हे नेहमी बंदच असतात. कधी सिग्नलची रंगीत तालीम होते. मात्र अद्यापही सिग्नल यंत्रणा धूळखात पडून असल्याने दररोज वाहतुकीची कोंडी होते.