लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर: भाजप महानगर, भाजयुमो, भाजप युवा व युवती मोर्चातर्फे चंद्रपूरात ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट निःशुल्क दाखविण्यात आला. या चित्रपटाचा शहरातील अनेक युवक युवतींनी लाभ घेतला. ‘लव्ह-जिहाद’च्या नावाखाली मुलींचे होणारे धर्मांतरण, शारीरिक, मानसिक शोषण व त्यातून निर्माण होणारा दहशतवाद हे भयावह वास्तव बघून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. विशेष म्हणजे अनेक युवतींनी आईसोबत हा चित्रपट बघितला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात हे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महासचिव रवींद्र गुरनुले, ब्रिजभूषण पाझरे, कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, हरिश शर्मा, अल्‍का आत्राम, रंजना किन्‍नाके, छबु वैरागडे, यश बांगडे, मुग्धा खांडे, जयश्री आत्राम, मोनिषा महतव आदींची उपस्थिती होती. ‘द केरला स्टोरी’ नावाचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट विशेषतः युवतींना बघता यावा व त्यांना ‘लव्ह-जिहाद’चे वास्तव कळावे म्हणून निःशुल्क व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा व युवतींनी मुनगंटीवार यांच्याकडे केली होती.

हेही वाचा… वारांगणा आणि नको त्या अवस्थेत ग्राहकांची पळापळ… वाचा कुठे घडला हा प्रकार?

मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून नि:शुल्क चित्रपट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ‘लव्ह-जिहाद’चे संकट, तरुणी व महिला कशा जाळ्यात अडकवल्या जातात? संघटित धर्मांध शक्तीचे जाळे कसे असते? याचे वास्तव यात आहे. एकही मुलगी या आक्रमणाला बळी पडता कामा नये, अशी अपेक्षा डॉ. मंगेश गुलवाडे यांनी व्यक्त केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The kerala story movie was screened free of cost in chandrapur by bjp rsj 74 dvr
Show comments