नागपूर: खाकी वर्दी घालून गुंडगिरी करणे एका पोलीस अधिकाऱ्याला चांगलेच भोवले. दारुच्या नशेत कार चालवून एक दुचाकीस्वाराला धडक दिल्यानंतर पोलिसात तक्रार केल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका ठाणेदारासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर कोराडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रवीण मुंढे (४८, ठाणेदार), शैलेश यादव (४०) आणि प्रदीप माने (३८) अशी आरोपी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
प्रवीण मुंढे हे सहायक पोलीस निरीक्षक असून गुन्हा घडला त्यावेळी ते खापरखेडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार होते. तर शैलेश आणि प्रदीप हे दोघेही पोलीस कर्मचारी असून मुंढे यांच्यासाठी ते वसुलीचे काम करीत होते. प्रवीण मुंढे हे वादग्रस्त अधिकारी असून यापूर्वी एका आरोपीचे पोलीस कोठडीत केस जाळल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तक्रारदार युवक शुभम वाहणे (रा. खापरखेडा) हा एका औषध कंपनीत विक्री प्रतिनिधी म्हणून नोकरी करतो. तो १३ जूनला रात्री दुचाकीने मित्रासह घरी जात होता.
हेही वाचा… यवतमाळ: दरोड्याच्या प्रयत्नातील नऊ जणांना अटक; आर्णी पोलिसांची कारवाई
कोराडी ठाण्याच्या हद्दीत शेर-ए-पंजाब ढाब्याजवळ ठाणेदार प्रवीण मुंढे यांनी दारुच्या नशेत कार चालवून शुभमला धडक दिली. गंभीर जखमी शुभमला मदत करण्याऐवजी प्रवीण मुंढे यांनी पोलीस अधिकारी असल्याचे सांगून पिस्तूल काढली. शुभमच्या डोक्यावर ठेवून तक्रार दिल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. तर पोलीस कर्मचारी शैलेश यादव आणि प्रदीप माने यांनी शुभमला गांजा विक्रीच्या बनावट प्रकरणात आरोपी करून अटक करण्याची धमकी दिली. यादरम्यान, कोराडी पोलिसांची गाडी तेथे आली. त्यामुळे शुभमने घडलेला प्रकार सांगितला. जखमी शुभमला खापरखेड्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेही ठाणेदार प्रवीण मुंढे, कर्मचारी प्रदीप आणि शैलेश तेथे पोहचले. त्यांनी शुभमला तक्रार देण्यापासून परावृत्त केले तसेच भावाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली.
पोलिसांना वाचविण्याचा प्रयत्न
शुभम वाहणे हा गरीब युवक असून या प्रकरणी कोराडी पोलीस आरोपी पोलीस अधिकारी प्रवीण मुंढे, कर्मचारी प्रदीप माने आणि शैलेष यादव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत होते. शुभम दररोज कोराडी पोलीस ठाण्यात चकरा मारत विनवणी करीत होता. मात्र, कोराडीचे ठाणेदार विजय नाईक हे गुन्हा दाखल होणार नाही, या भूमिकेवर ठाम होते. आरोपीच्या पिंजऱ्यात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असल्यामुळे कोराडी पोलिसांनी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेबर, ऑक्टोबर आणि १० नोव्हेंबरपर्यंत गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे शुभमने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे नाईलाजास्तव कोराडी पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला.