वर्धा: एक ते बारा ऑगस्टदरम्यान चाहूलही न देणाऱ्या पावसाने गेल्या चार दिवस हजेरी लावली. आता परत आभाळ कोरडेठाक आहे. या पार्श्वभूमीवर ऑगस्ट महिन्यातील हमखास पडणाऱ्या पावसाचा यापूर्वी कसा इतिहास राहिला, हे तपासणे उत्सुकतेचे ठरत आहे.
जाणकार म्हणतात की, हा कदाचित इतिहासातील सर्वात कोरडा ऑगस्ट महिना राहू शकतो. प्राप्त आकडेवारीनुसार, १९१३ मध्ये १८८.८ मिमी, १९२० मध्ये १९२.४, २००५ मध्ये १९०.१ , २००९ मध्ये १९२.५, २०२१ मध्ये १९६.२ मिमी अशी ऑगस्ट महिन्यातील सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. आता यावर्षी १९ ऑगस्टपर्यंत केवळ १०६.२ मिमी पावसाची नोंद झाली. या महिन्यात सलग बारा दिवस पाऊस न पडण्याची बाब गेल्या १४ वर्षात प्रथमच घडली. पावसाचा या महिन्यातील अनुशेष चाळीस टक्क्यांवर जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पूर्वी २० ते २५ टक्के उणे सरसरीची नोंद झालेली आहे. अद्याप आठ दिवस बाकी आहेत. मात्र या पुढील कालावधीत पाऊस पडेलच याची शंभर टक्के खात्री जाणकार देत नाही.
हेही वाचा… नोकरीसाठी क्युआर कोडद्वारे पैशाची मागणी; महामेट्रोने केला खुलासा
मुंबई हवामान विभागाचे डॉ.अनुपम कश्यपी म्हणतात की, कालावधीची आकडेवारी सांगता येणार नाही. पण हे निश्चित की, हा ऑगस्ट सर्वात कोरडा ठरणार. यापुढील आठ दिवसात किती व कसा पाऊस पडणार याबाबत आता सांगता येणार नाही. पण पडेल अशी आशा करू या, असे मत डॉ. कश्यपी यांनी ‘लोकसत्ता ऑनलाईन’सोबत बोलताना व्यक्त केले.