नागपूर : शहीद चौक ते केळीबाग रोडचे रुंदीकरण आणि चितारओळीत झालेली बांधकामे यामुळे मूर्तिकारांसाठी जागाच शिल्लक नसल्यामुळे दीड महिन्यावर आलेल्या गणेशोत्सवासाठी मूर्ती घडवायच्या कशा, असा प्रश्न मूर्तिकारांपुढे निर्माण झाला आहे. मूर्तिकारांची वस्ती असलेली चितारओळची ओळख पुसली जाते की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
महाल परिसरात असलेली चितारओळ ही गणेश, दुर्गा व वेगवेगळ्या उत्सवासाठी लागणाऱ्या इतरही मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांची वस्ती म्हणून परिचित आहे. येथील मूर्तिकार पिढ्यानपिढ्या मूर्तीकामाचा वारसा जोपासत आले आहेत. गणपती उत्सव आला की या बाजारात गणपतीच्या मोठमोठ्या मूर्ती आकार घेताना दिसायच्या. इथल्या मूर्ती इतक्या प्रसिद्ध की संपूर्ण मध्य भारतात येथून मूर्ती पाठवल्या जायच्या. मूर्तिकारांकडे महाराष्ट्राबरोबरच मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश या राज्यांतूनही गणेश मूर्तीना मागणी असते. चितारओळीत काही पारंपरिक ४० ते ५० मूर्तिकार मूर्ती घडवण्याचे काम करतात. त्यांच्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होती. मात्र, गेल्या तीन चार वर्षात निवासी आणि व्यावसायिक संकुल बांधण्यात आले आहे. त्यामुळे आज जी काही १० ते १२ जुन्या मूर्तिकारांची घरे शिल्लक आहे त्यांना मूर्ती घडवण्यासाठी पुरेशी जागा राहिलेली नाही. त्यामुळे अनेक जुने मूर्तिकार अडचणीत आले आहेत. त्यात केळीबाग मार्गावरील अनेक दुकाने तोडण्यात आल्यामुळे ती दुकाने चितारओळीत आली आहे. ज्या ठिकाणी मूर्तिकारांची घरे आहेत ती मुळातच लहान आहेत. त्यामुळे घरात मोठ्या मूर्ती ठेवता येत नाही. पावसाळ्यात तर बाहेर मूर्ती ठेवता येत नाहीत. ज्या खुल्या जागेवर मूर्ती ठेवल्या जात होत्या त्या ठिकाणी घरे व दुकाने बांधण्यात आली आहे. त्यामुळे पारंपरिक मूर्तिकारांना आता जागेची चणचण जाणवत आहे.
हेही वाचा >>>आर्णी येथील सराफा व्यवसायिकाला लुटणाऱ्या आरोपींना अटक; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
चितारओळ मूर्तिकार संघटनेने पाच वर्षांपूर्वी महापालिकेकडे गणेशोत्सवाच्या काळात जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली होती. त्यावेळी तत्कालीन महापौैर नंदा जिचकार यांच्या कार्यकाळात तसा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. नंतर मात्र त्याचे पुढे काहीच झाले नाही.
चितारओळीत आता मूर्तिकारांची संख्या कमी झाली आहे. शिवाय बाहेरच्या लोकांनी येथे अतिक्रमण केले आहे. मोकळ्या जागांवर निवासी संकुले उभी झाली. त्यामुळे मूर्ती घडवण्यासाठी पुरेशी जागा राहिलेली नाही. याबाबत प्रशासनाने गणेशोत्सवाच्या काळात मूर्तिकारांना जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.- प्रमोद सूर्यवंशी, मूर्तिकार