प्रशांत देशमुख

वर्धा : ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा प्रारंभ ग्रंथ दिंडी आणि मुलांनी केलेल्या ९६ वृक्षारोपणाने झाला. दिंडी निघणार म्हणून आज शहर पहाटेच जागे झाले. दिंडी मार्गावरील घरं, व्यापारी संकुल, शाळांपुढे सडाशिंपण करीत रांगोळ्या रंगल्या. महात्मा गांधी पुतळ्याजवळ दिंडीत सहभागी होणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला. दिंडीस ही उत्साही सलामी ठरली. सीताअशोक वृक्षाचे रोप लावल्यानंतर लेझीमचा नाद सुरू झाला. दिंडीतल्या पालखीत असलेल्या ग्रामगीता व अन्य ग्रंथाचे पूजन झाले. दिंडीस प्रारंभ झाला. सर्वात लक्षवेधी सहभाग गुरूकुंज माेझरी येथील राष्ट्रसंत विद्यालयाच्या टाळमृदूंगाचा ठरला.

भगव्या टोपीतील २५० बाल विद्यार्थी राट्रसंतांची भजने तालासुरात व पदलालित्यासह गात पुढे निघाली. बावीसशे विद्यार्थ्यांच्या सहभागासह विविध  चित्ररथ, ऐतिहासिक स्थळांची सजावट असलेले विविध वाहने, विठूरायाचा गजर, बँडपथक  वाजतगाजत पुढे जात होते. वाटेत नागरिकांकडून पूष्पवर्षाव होतच होता. मुलांचा उत्साह वाढविण्यासाठी संमेलनाचे कार्यवाह प्रदीप दाते, आमदार डॉ.पंकज भोयर, मावळते संमेलनाध्यक्ष भारत सासने, साहित्य महामंडळाच्या श्रीमती उषा तांबे व अन्य पदाधिकारी, प्रकाश महाराज वाघ, मुरलीधर बेलखोडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Story img Loader