यवतमाळ : अधिक मासाचे महत्त्व म्हणून मुलगी आणि जावायला सासरच्या लोकांनी पाहूणचारासाठी बोलावले. धोंड्याचा महिना जोरात साजरा झाला. माहेरचा पाहूणचार घेऊन सासरकडे जाताना विवाहिता पैनगंगा नदीच्या पुरात पडली व वाहून गेली. अद्याप तिचा शोध लागला नाही. ही घटना विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर उमरखेड तालुक्यातील बोरी चातारी येथे रविवारी सायंकाळी घडली.

माया अमोल पतंगे (२८), रा. वडगाव, जि. नांदेड असे या महिलेचे नाव आहे. हिमायतनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणारे वडगाव हे या महिलेचे सासर आहे, तर यवतमाळ जिल्ह्यातील ब्राह्मणगाव नजीकचे परजना हे गाव तिचे माहेर आहे. परजना येथील गोविंदराव सावंत यांची ती मुलगी आहे. धोंड्याचा महिना असल्याने मायाला जावयासह परजना येथे पाहूणचारासाठी बोलावण्यात आले होते. पाहूणचारानंतर रविवारी माया आपल्या सासरी वडगाव येथे जाण्यास निघाली. मात्र, प्रवासात बोरी-चातारी येथील पैनगंगा नदीच्या पुरात पडली आणि वाहून गेली.

हेही वाचा – बुलढाणा : गजानन महाराज पालखी शेगावात परतली, खामगाव पायदळ वारीत हजारो भाविक सहभागी

हेही वाचा – वाशिम : केवळ बैठकांचा फार्स! मंत्र्यांचा पाहणी दौरा म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार, शेतकरी वर्गातून संताप

या घटनेबाबत परिसरात विविध चर्चा आहे. माया एकटीच पुराच्या पाण्यात कशासाठी गेली, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुलावर मायाला सेल्फी काढण्याचा मोह झाला आणि त्यातच ती तोल जाऊन पडली व वाहत गेली असे सांगितले जात आहे. तिचा शोध सुरू आहे.

Story img Loader