बुलढाणा : राष्ट्रमाता जिजाऊंची जन्मभूमि आणि राजे लखुजीराव जाधव यांची कर्मभूमि असलेल्या सिंदखेडराजा नगरीत स्वातंत्र्यदिनी भारतमातेला अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात येणार आहे. सोलापुरातील बाल मावळे सलग ५ तास ५ मिनिटे, ५ सेकंद शिवकालीन ५ शस्त्रे चालविण्याचा विक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहे. एशियन बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि इंडिया बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे प्रतिनिधी यावेळी हजर राहणार आहे.
ऐतिहासिक सिंदखेडराजा नगरीतील संत सावता भवन येथे सकाळी ११ वाजता हा शस्त्रकौशल्यचा थरार व पाच बालकांच्या जिद्दीचे प्रदर्शन होणार आहे. राजमाता फाऊंडेशन सिंदखेड राजा व लाठी असोसिएशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा विक्रम घडणार आहे. हे पाच पांडव तलवार, भाला, दांडपट्टा, परशु, कुऱ्हाड आणि लाठी हे पाच शस्त्र सलग पाच चालवून राष्ट्रमाता जिजाऊ, शिवाजी महाराज आणि भारत मातेला मानवंदना देणार आहेत.
हे मावळे दहा ते बारा वर्ष वयोगटातील असून मागील दोन महिन्यांपासून त्यांचा सराव सुरु आहे. या चमूत प्रशिक्षक अश्विन कडलासकर (तलवार), प्रतोष आळंद (परसू कुऱ्हाड), छत्रवीर पवार (दांडपट्टा), आदिनाथ खंडेराव (भाला), श्लोक कोळी (लाठी) हे शस्त्र चालविणार आहे.