नागपूर : तब्बल दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर मोसमी पाऊस परतला होता, पण मोसमी पावसाला पोषक स्थिती नसल्यामुळे पुढील तीन दिवस राज्यभरात पाऊस विश्रांती घेईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मोसमी पावसाचा आस हा उत्तरेकडे सरकला आहे. यामुळे पुढील तीन दिवसांत राज्यात पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. २४ ऑगस्टनंतर पश्चिमी वाऱ्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण, गोवा, मध्यमहाराष्ट्रात तसेच घाट विभागात तुरळक ठिकाही मुसळधार ते माध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हेही वाचा – गोगलगाय अन् शेतकऱ्यांना करी दे माय धरणी ठाय
राज्यात १८ ऑगस्टपासून दडी मारलेला मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला होता. तीन दिवस विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात जोरदार पाऊस झाला होता. मात्र, राज्यात पाऊस पडण्यास पोषक स्थिती नाही. त्यामुळे राज्यात पुढील तीन दिवस पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. तर शुक्रवार, २५ ऑगस्टपासून कोकण आणि घाट परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – भंडारा : जुन्या वादातून तरुणाचा दगडाने ठेचून खून
बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र वायव्य दिशेने पुढे निघून गेले आहे. आज कोकण, गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भात काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. २२ ते २५ ऑगस्ट मध्ये कोकणात बहुतांश ठिकाणी मध्यमहाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.