कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी यवतमाळ जिल्ह्यातील काही गावांमध्ये शुक्रवार आणि शनिवारी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शनिवारी सायंकाळीदौऱ्यादरम्यान त्यांनी उमरखेड तालुक्यातील मोहगाव – सुकळी येथे शेताच्या बंधावर जाऊन शेतकऱ्याच्या घरातील भाजी – भाकरीचा पाहुणचार स्वीकारला.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार तीन दिवशीय विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या धावत्या दौऱ्यादरम्यान सत्तार यांनी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. काही भागांना अचानक भेटी दिल्या. रस्त्यावर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांना थांबण्याची विनंती केली. शेतकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. जिल्ह्यातील आर्णी, महागाव, सुकळी आणि मार्लेगाव येथे भेट देऊन शेतात जाऊन कपाशी, तुर आणि सोयाबीन पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तत्काळ देण्याचेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी आमदार नामदेव ससाणे, माजी आमदार विजय खडसे आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी शेताच्या बांधावर भाजी- भाकरीचा आस्वाद घेतला.
हेही वाचा – अमरावती : कुपोषण आणि बालमृत्यूसाठी सर्वच राज्यकर्ते जबाबदार – अजित पवार
आत्महत्याग्रस्त महिला शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट टाळली
कृषिमंत्री सत्तार दोन दिवस जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर फिरत असताना त्यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला गुरुवारी तालुक्यातील साखरतांडा येथे शांता सूर्यभान चव्हाण (५५) या महिला शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. अतिवृष्टी आणि बँकेचे कर्ज यामुळे त्रस्त होऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते. कृषिमंत्री सत्तार यांनी शनिवारी आर्णी तालुक्यात भेट दिली मात्र, साखरतांडा येथील आत्महत्याग्रस्त महिला शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेण्याचे टाळल्याने संताप व्यक्त होत आहे. कृषिमंत्र्यांच्या या कृतीने विरोधकांनी त्यांच्यावर प्रसिद्धीचा फार्स करत असल्याची टीका केली आहे.