भरदिवसा चाकूच्या धाकावर एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला संतप्त जमावाने बेदम मारहाण करून त्याची हत्या केल्याची घटना जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे गुरुवारी रात्री उशिरा घडली.नईम खान (३५), असे मृत आरोपीचे नाव आहे. तो आपल्या तीन साथीदारांसह बुधवारी दुपारी चांदूर रेल्वे येथील पीडित मुलीच्या घरी आला होता. आरोपींनी मुलीच्या कुटुंबातील सदस्यांसमोरच चाकूचा धाक दाखवून बळजबरीने मुलीला वाहनात बसवून पळवून नेले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून अपहृत अल्पवयीन मुलगी आणि आरोपींचा शोध सुरू केला होता. पण, दुसऱ्याही दिवशी युवतीचा शोध न लागल्याने कुटुंबीय आणि परिसरातील लोक संतप्त होते.
हेही वाचा >>> दमदार पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भाची पाण्याची चिंता मिटली
दरम्यान, गुरूवारी रात्री उशिरा आरोपीने अपहृत मुलीला तिच्या घराच्या परिसरात आणून सोडले. तो पळून जाण्याच्या बेतात असतानाच जमावाने त्याला घेरले आणि बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. मारहाणीत नईम शेख जागीच ठार झाला.तत्पूर्वी, गुरुवारी परिसरातील नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून आरोपींना पकडण्याची आणि युवतीला सुखरूप परत आणण्याची मागणी केली होती. नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले होते. ठाणेदार विलास कुलकर्णी यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. चांदूर रेल्वे पोलिसांचे एक पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके अपहृत युवती आणि आरोपींच्या शोधासाठी रवाना झाली होती. पण, काल रात्री आरोपी नईम खान हा युवतीला तिच्या घरी सोडून देण्यासाठी आला आणि संतप्त जमावाच्या तावडीत सापडला.