बुलढाणा : शेतकऱ्यांच्या हातातील मोबाईल त्यांना पिकांवरील रोग व किडीवर उपाययोजना सुचविणार आहे. यामुळे तातडीने योग्य ओषधीची फवारणी करुन पिकांचे नुकसान टाळणे शक्य होणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे यांनी ही महत्त्वाची माहिती दिली.
केंद्रीय कृषी मंत्रालयामार्फत ‘नॅशनल पेस्ट सर्विलन्स सिस्टीम’ (एन.पी.एस.एस) हे ‘मोबाईल ॲप’ विकसित करण्यात आले आहे. हे ॲप ‘प्ले स्टोअर’मधून आपल्या भ्रमणध्वनीमध्ये घेता येते. याची कार्यपद्धती सोपी आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात पिकांचे निरीक्षणे करून कीड व रोगांची प्राथमिक माहिती त्यात नमूद करावी. त्यावर शेतकऱ्यांना तत्काळ उपायोजना सुचविल्या जाऊन कोणते कीटकनाशक वापरावे याची माहिती देण्यात येते. त्यामुळे पिकावर तत्काळ फवारणी करून, होणारे जास्तीचे नुकसान टाळता येणार आहे. लाखो शेतकऱ्यांसाठी हे ॲप उपयुक्त ठरणार आहे.
हेही वाचा – केंद्राने आपत्तीकाळात पाठविले १ हजार ३५९ कोटी ‘एसएमएस’
सध्या या ॲपद्वारे मिरची, कापूस, आंबा, मका व भाताची कीड व रोग व्यवस्थापन बाबतची माहिती नोंदवता येण्याची सुविधा आहे. मात्र लवकरच यात इतरही पिकांचा समावेश करण्यात येणार असल्याचे मनोज ढगे यांनी सांगितले. शेतकरी व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारीदेखील पिकांवरील कीड व रोगांची निरीक्षणे नोंदवू शकतात. पिकांवरील कीड व रोगांची माहिती देत प्रतिबंधात्मक उपाययोजना सूचित करू शकतात.
हेही वाचा – आठ लाखांचे देयक! चार लाखांची लाच, २० टक्क्यांत तडजोड…
जिल्हा अधीक्षक कार्यालयाकडून नुकतेच जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी व कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांना याचे प्रशिक्षण देण्यात आले. केंद्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र, नागपूर येथील सहसंचालक डॉ. ए. के. बोहरीया, उपसंचालक डॉ. मनीष मोंढे, पिक संरक्षण अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.