नागपूर : पाचपावली उड्डाणपुलावर प्रचंड खड्डे असून वाहन चालकांना पाठ आणि कंबरदुखीचा त्रास जाणवत आहे. तरीही प्रशासन खड्डे बुजवण्याची तसदी घेत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने प्रशासनाचा निषेध केला. राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांच्या नेतृत्वात अर्बन सेल, गोळीबार गांजाखेत व्यापारी संघ यांच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात आंदोलन करण्यात आले.
शहरात सुरू असलेले काँक्रिटीकरण व अर्धवट असलेली रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण व्हावी आणि पाचपावली पुलावरील खड्डे बुजवण्यात यावे, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तसेच कंत्राटदारांना जाग यावी म्हणून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला काळे फासण्यात आले. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांकडे डोळेझाक करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांचे कंत्राटदाराशी साटेलोटे असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
हेही वाचा – युरियाच्या कृत्रिम टंचाईमुळे शेतकऱ्यांची अडचण
हेही वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस
पाचपावली पूल हा उत्तर नागपूर आणि मध्य नागपूर येथील मुख्य बाजारपेठ असलेल्या क्षेत्राला जोडणारा मुख्य पूल असून त्याची दुर्दशा झाली आहे. नागरिकांना वाहने नेताना मोठमोठ्या खड्ड्यांमुळे मणक्याचे आजार आणि पाठदुखी होत अनेक अपघात होत आहेत. यासाठी या आंदोलनात नागरिकांना पाठदुखीवर उपाय म्हणून बाम वाटण्यात आला. तसेच काही दुचाकी चालकांच्या पाठीवर झेंडू बाम चोळून देण्यात आला.