नागपूर: शहरातील रस्त्यावर जनावरांचा सुळसुळाट सुरू असल्याने महापालिकेने कठोर पाऊल उचलले असून रस्त्यावर जनावर सोडणाऱ्यांना तीन हजार रुपये दंड आणि एक महिना कारावासाची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षा ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील एक हजार गोठे मालकांना नोटीस देण्यात आल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शहरात गोठ्याची संख्या वाढली आहे. अनेक जण त्यांच्याकडील जनावणे रस्त्यावर सोडून देतात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेने यासंदर्भात कडक धोरण अवलंबले असून शहरातील एक हजार गोठे मालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. शहरात रस्त्यावर गुरे सोडणे महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम २३३ आणि कलम ३७६ (अ)चे उल्लंघन असल्याचे नोटिसीत म्हटले आहे. त्यामुळे याचे उल्लंघन केल्यास मुंबई पोलीस अधिनियम, १९५१च्या कलम ९० (अ) आणि ११८अंतर्गत गुरेढोरे मालकांकडून दंड आकारता येऊ शकतो. तसेच कायद्यात एक महिन्यापर्यंत शिक्षेची तरतूद आहे. गायी, म्हशी रस्त्याच्या मधोमध बसत असल्याने वाहतुकीला खोळंबा होऊन वाहतुकीची कोंडी होत असल्याने वाहनचालक त्रस्त आहेत.
हेही वाचा… अकोला: पैसे खर्च झाले अन् युवकाने रचला जबरी चोरीचा बनाव; पोलीस तपासात फुटले बिंग
महापालिकेच्या दाव्यानुसार, अशाप्रकारे जनावरे रस्त्यावर सोडणाऱ्या मालकांकडून नियमितपणे दंड आकारण्यात येतो. महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागानुसार चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत २७७ जनावरांच्या मालकांकडून २.३७ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.