प्रशांत रॉय, लोकसत्ता
नागपूर: खर्रा हा नागपूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय. खर्रा खाऊन पिचकाऱ्या मारत शहराला रंगीबेरंगी करणारे नागपूरकर ‘वर्ल्ड फेमस’ आहेत. लवकरच ‘जी-20’ निमित्त जागतिक पातळीवरचे प्रज्ञावंत संत्रानगरीत येणार आहे. त्यांना खर्रा खाऊन जागोजागी मारलेल्या पिचकाऱ्या दिसू नये यासाठी नागपूर महापालिकेने सोशल मीडियाचा आधार घेतला आहे.
नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी यासाठी महापालिकेने ‘दिवार’ या क्लासिक चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि शशी कपूर या जोडगोळीचा ‘डायलॉग’ ‘पोस्ट’ केला आहे. या ‘पोस्ट’ची समाजमाध्यमामध्ये मोठी चर्चा असून ‘नेटिझन’ त्यावर व्यक्त होत आहेत.
आणखी वाचा- धक्कादायक..! ‘जी २०’साठी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत चोरीच्या विजेने!
या ‘पोस्ट’मध्ये दोन्ही अभिनेत्यांचे फोटो असून बच्चन म्हणतो’, मेरे पास संत्रा बर्फी है, सावजी मसाला है, तर्री पोहे है, तुम्हारे पास क्या है’ यावर शशी कपूर म्हणतो, ‘मेरे मुहं मे खर्रा है’. येथे महापालिकेने ‘दिवार’पर मत थुकना अशी पंचलाईन टाकून धमाल उडवून दिली आहे.
महापालिकेच्या या डायलॉगरुपी सिक्सरवर नेटिझनसह नागरिक आणि युवक मोठ्या प्रमाणावर ‘रिऍक्ट’ होत आहेत. या ‘पोस्ट’ला ‘टॅग’ करून ते त्यांची मते, अभिनव कल्पना मांडत आहेत. या ‘पोस्ट’वर एक जण व्यक्त होत म्हणाला, ‘खरच ‘ऐक्सलेंट’ पध्दतीने सांगायचा प्रयत्न. पण आंधळ्या, बहिऱ्या बधिरांना कळेल का? चांगल्या ‘हाय एण्डच्या एसयुव्ही’ गाड्यांचे दरवाजे सिग्नलवर ऊघडतात व रस्त्यावर पिचकारी मारतात’. दुसरा लिहितो की ‘महापालिकेचेच ८० टक्के कर्मचारी खर्रा खातात, त्याचे काय? खोटं वाटत असेल तर तेथील बाथरूम चेक करा.’ असे अनेक मेसेज या पोस्ट संदर्भात फिरत आहे.
नागपूर पोलिसांनी मागे अशाच काही आकर्षक पोस्ट करून लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. आता महापालिकेनेही त्यांची री ओढली आहे. पालिकेचा उद्देश जरी चांगला असला तरी लोक सुधरतील का हा मोठा प्रश्न आहे.