बुलढाणा: देऊळगाव राजा पाठोपाठ संत नगरी शेगाव व दुसरबीड येथील मुस्लीम समुदायाने आषाढीला कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला आहे. शेगाव शहर पोलीस ठाण्यात या दोन्ही सणानिमित्त शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी मुस्लीम बांधवांनी आषाढीला बकरी ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पोलिसांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

आषाढीला संतनगरीत हजारो भाविकांची गर्दी उसळते. पंढरपूरला जाऊ न शकणारे भाविक शेगावात येतात. यामुळे पोलिसांवर बंदोबस्ताचा मोठा ताण असतो. याच दिवशी दोन्ही सण आल्याने पोलिसांची चिंता वाढली होती. मात्र मुस्लीम बांधवांच्या भूमिकेने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा… अकोला: करोना काळात ज्याला आधार दिला, तोच काळ बनून उलटला; नोकराने केली ढाबा मालकाची हत्या

दुसरबीडमध्ये दुसऱ्या दिवशी ईद

दुसरबीड (ता. सिंदखेड राजा) येथील समुदायाने देखील असाच निर्णय आमदार तथा माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या उपस्थितीत घेतला. आमदार शिंगणे यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून ही बाब सामाजिक सलोखा, एकोपा दर्शविणारी असल्याचे सांगितले. यावेळी मस्जिद समितीचे अध्यक्ष सादिक शेख, शेख इरफान अली, शेख अमीर पटेल, शेख अहमद, अमीर हाजी, शेख राशद, शेख दिलावर, शेख इर्शाद, शेख समीर शेख हमजा हजर होते.

Story img Loader