अमरावती : Maharashtra mlc election result 2023 अत्यंत अटीतटीच्या ठरलेल्या अमरावती पदवीधर मतदार संघातील निवडणुकीत तब्बल ८ हजार ३८७ मते ही अवैध ठरली आणि त्यातही बहुतांश मतपत्रिका या भाजपाचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांच्या नावासमोर फक्त २ हा अंक लिहलेल्या आढळल्या. या मतपत्रिकांवर पहिली पसंती म्हणजे १ हा अंक लिहिला नसल्याने या शेकडो मतपत्रिका अवैध ठरल्या. नेमका याच मतांनी रणजित पाटील यांना दगा दिल्याची चर्चा मतमोजणी केंद्रस्थळी रंगली.
मतमोजणी केंद्राबाहेर काल सकाळपासूनच डॉ. रणजित पाटील आणि धीरज लिंगाडे यांच्या समर्थकांची गर्दी होती. सायंकाळपर्यंत धीरज लिंगाडे हे सुमारे दोन हजार मतांची आघाडी टिकवून असल्याने भाजपा कार्यकर्त्यांची गर्दी कमी झाली. पण, अवैध मतांच्या आकडेवारीने डॉ. रणजित पाटील यांच्या समर्थकांची अस्वस्थता वाढली. पहिल्या पसंतीची मतमोजणी आटोपली तेव्हा तब्बल ८ हजार ७३५ मतपत्रिका या अवैध ठरल्याचे दिसून आले.
हेही वाचा >>> MLC Election 2023 : अमरावती पदवीधर मतदार संघातील निकाल का रखडला?
मतमोजणीच्या वेळी प्रत्यक्ष हजर असलेल्या उमेदवारांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. रणजित पाटील यांच्या नावासमोर २ हा अंक लिहिलेल्या शेकडो मतपत्रिका आढळून आल्या. मतपत्रिका वैध ठरण्यासाठी किमान पहिल्या पसंतीचे म्हणजे १ हा अंक नोंदवणे आवश्यक आहे. तोच नसल्याने ही मते अवैध ठरवली गेली. निरीक्षकांच्या अंदाजानुसार अशा मतपत्रिकांची संख्या ही ३ हजारांच्या वर होती.
मतपत्रिकेवर डॉ. रणजित पाटील यांचा क्रमांक हा दुसरा होता. तर पहिल्या क्रमांकावर धीरज लिंगाडे हे होते. हे मतदारांचे अज्ञान की राजकीय खेळी, याची चर्चा आता रंगली आहे. या अवैध मतांमुळे डॉ. रणजित पाटील यांना फटका बसला, असे सांगण्यात येत आहे. या निवडणुकीमध्ये एकूण २ लाख ६ हजार १७२ मतदारांची नोंदणी झाली होती. त्यापैकी १ लाख २ हजार ५८७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी ९४ हजार २२० मते वैध तर ८ हजार ३८७ मते अवैध ठरली.
या निवडणुकीमध्ये भाजप समर्थक मतदारांनी कुठलाही विचार न करता उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांच्या नावापुढे फक्त २ चा आकडा लिहिला. पहिला पसंती क्रमांक नसल्याने सुमारे ३ हजारांच्या वर मते अवैध ठरली, असे सांगितले जात आहे. अनेक मतपत्रिका या को-या होत्या, तर अनेक मतपत्रिकांवर उमेदवारांच्या नावासमोर फुल्या मारलेल्या आढळून आल्या.