नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात कायदेमंडळाची भूमिका लक्षात घेता भारतीय दंड विधानातील ४९८-अ कलमामधील तरतुदीचा व्यापक अर्थ मांडणारा निर्णय दिला. पतीने पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला नसताना तिच्या संमतीशिवाय दुसरे लग्न करणे ही क्रूरताच होय, असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले.
न्यायमूर्ती द्वय सुनील शुक्रे व महेंद्र चांदवाणी यांनी हा निर्णय दिला. कायदेमंडळाने पती व त्याच्या नातेवाइकांकडून विवाहितेचा छळ होऊ नये या भूमिकेतून भारतीय दंड विधानामध्ये ४९८-अ कलमाचा समावेश केला आहे. या कलमातील तरतुदीनुसार, विवाहित महिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होईल किंवा तिच्या जिवाला धोका उत्पन्न होईल, अशी कृती करणे क्रूरता ठरते.
हेही वाचा: ठरलं! गुजरातच्या सिंहांचा महाराष्ट्रातील ‘या’ प्राणीसंग्रहालयात प्रवेश
तसेच, मालमत्ता किंवा मौल्यवान वस्तूंची मागणी बळजबरीने पूर्ण करण्याकरिता महिला किंवा तिच्या नातेवाइकांवर दबाव आणणेही या कलमानुसार गुन्हा आहे. पतीने पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला नसताना व तिची संमती नसताना दुसरे लग्न करणे, ही कृती तिच्या मानसिक आरोग्यावर आघात करणारी आहे. परिणामी, ही कृतीही कलम ४९८-अ अंतर्गतची क्रूरताच ठरते, असे न्यायालयाने निर्णयात सविस्तरपणे नमूद केले.