चंद्रशेखर बोबडे
नागपूर : राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस, त्यानंतर इंडियन फार्मसी परिषद आणि आता २१ मार्चपासून होत असलेली ‘जी-२०’ शिखर परिषद यासारख्या एकापाठोपाठ एक अशा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांमुळे व त्यासाठी येणाऱ्या देशविदेशातील प्रतिनिधींमुळे नागपूरसह विदर्भातील हॉटेल व्यवसाय आणि त्यांच्याशी सुसंगत उद्योगाला एका दशकानंतर प्रथमच उभारी मिळाली आहे.
देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले नागपूर मध्य भारतातील एक आणि विदर्भातील प्रमुख व्यापार केंद्र आहे. २०१४ नंतर येथे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषद, परिसंवाद, मोठय़ा उद्योग समूहांच्या बैठका, व्याघ्र प्रकल्प भ्रमणासाठी मोठय़ा संख्येने येणाऱ्या विदेशी पर्यटकांमुळे नागपूरसह विदर्भातील चंद्रपूर, अमरावतीसह हॉटेल व्यवसायामध्ये वाढ झाली. नागपूर रेसिडेन्शियल हॉटेल्स असोसिएशनचे अध्यक्ष तेजिंदरसिंग रेणू यांनी दिलेल्या माहितीनुसार एकटय़ा नागपुरात ७५० हून अधिक निवासी हॉटेल्स व रेस्टॉरन्ट्स आहेत. विदर्भात ह़ॉटेल्स व्यवसायामध्ये सुमारे दहा हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल आहे. यात हॉटेल्ससह रेस्टॉरंट, टॅक्सीज, पर्यटन, रिसॉर्ट व तत्सम व्यवसायांचा समावेश आहे. एका दिवसाला मोठय़ा हॉटेल्स व रेस्टॉरंटपासून मिळणारा महसूल हा ५० हजारांपासून दीड लाखांच्या घरात आहे. विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यात सातत्याने वाढ होत आहे.
करोना टाळेबंदी व त्यानंतर घालण्यात आलेले प्रतिबंधात्मक उपाययोजना यामुळे दोन वर्षांत हा व्यवसायाचे आर्थिकदृष्टय़ा कंबरडे मोडले होते. डिसेंबर २०२२ पासून नागपुरात एकापाठोपाठ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाल्याने उद्योगामध्ये तेजीचे चित्र आहे. डिसेंबर २२ च्या मध्यात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले. दोन वर्षांनंतर होणारे अधिवेशन असल्याने सर्व प्रमुख राजकीय पक्षाचे आमदार, खासदार यांच्यासह सनदी अधिकारी नागपुरात तळ ठोकून होते. त्यामुळे नागपुरात हॉटेल्समध्ये जागा मिळणे अवघड झाले होते.
डिसेंबर महिन्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा झाला. एकाच वेळी अनेक कार्यक्रमाचे उद्घाटन, भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. त्याच्या तयारीसाठी राज्य व केंद्राचे अधिकारी व सत्ताधारी पक्षाचे नेते नागपुरात तळ ठोकून होते. त्यानंतर जानेवारी महिन्यात तीन दिवसाची इंडियन काँग्रेस व त्यानंतर इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस पार पडली. या दोन्ही परिषदांसाठी देश-विदेशातून वैज्ञानिक, संशोधक, फार्मा उद्योजक यांच्यासह केंद्र व राज्याचे बडे अधिकारी, प्रतिनिधी आले होते. या काळातही हॉटेल्समध्ये जागा नव्हती. आता मार्च महिन्यात २१ व २२ ला जी-२० शिखर परिषद येथे होत असून त्यासाठी सुमारे ३०० प्रतिनिधी येणार आहेत. सर्व कार्यक्रमांसाठी येणाऱ्या प्रतिनिधींसाठी विदर्भ पर्यटन दौराही आयोजित केला जातो. त्यामुळे त्या भागातील रिसॉर्ट आणि हॉटेल्स व्यवसायातही तेजी आहे.
या महिन्यात होणाऱ्या जी-२० परिषदेसाठी येणाऱ्या विदेशी पाहुण्यांसाठी तारांकित हॉटेल्सचे आरक्षण झाले आहे.
– तेजिंदरसिंग रेणू, अध्यक्ष, नागपूर रेसिडेन्शियल हॉटेल्स असोसिएशन