नागपूर: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवनहन महामंडळात (एसटी) मागील सहा वर्षांची तुलना केल्यास बसेसची संख्या कमी झाली. परंतु कमी झालेल्या बसेसच्या तुलनेत अपघाताचे प्रमाण वाढले (प्रति लाख ०.१९ टक्के) आहे. त्यामुळे लालपरीच्या प्रवासात सर्वसामान्य प्रवाश्यांचा वाली कोण? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
‘गाव तेथे एसटी’, ‘रस्ता तेथे एसटी’, ‘प्रवाश्यांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य एसटी महामंडळ गिरवत असते. परंतु हल्लीच्या वाढत्या अपघातामुळे एसटीच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात २०१८- १९ मध्ये १६ हजार ४२४ बसेस होत्या. ही संख्या कमी- कमी होत २०२३- २४ मध्ये (नोव्हेंबरपर्यंत) १४ हजार ६१ वर आली. त्यामुळे एसटीच्या अपघाताचे आकडे कमी दिसत असले तरी कमी झालेल्या बसेसच्या तुलनेत अपघाताचे प्रमाण वाढलेले दिसत आहे.
हेही वाचा >>>महिलांना अनुदानावर पिंक ई-रिक्षा ; ६०० महिलांना मिळणार अर्थसाहाय्य
एसटी महामंडळात २०१८- १९ मध्ये ६ लाख २५ हजार किलोमिटरमागे १ अपघात, २०१९- २० मध्ये ५ लाख ८८ हजार २३५ किलोमिटर मागे १ अपघात, २०२०- २१ मध्ये ५ लाख ८८ हजार २३५ किलोमिटर मागे १ अपघात, २०२१- २२ मध्ये ५ लाख ५५ हजार ५५५ किलोमिटरमागे १ अपघात, २०२२- २३ मध्ये ५ लाख ५५ हजार ५५५ किलोमिटरमागे १ अपघात, २०२३- २४ (नोव्हेंबर २३ पर्यंत) ५ लाख २६ हजार ३१५ किलोमिटरमागे १ अपघात नोंदवला गेला. त्यामुळे एसटी महामंडळात अपघाताचे प्रमाण वाढल्याने चिंता वाढली आहे. हे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी एसटी महामंडळ आता काय पावले उचलणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा >>>योजनांना सहकार्य करा अन्यथा…बँकांवर जिल्हाधिकारी का संतापले?
अपघाताची संख्या
एसटी महामंडळात २०१८- १९ मध्ये एकूण ३,३१० अपघात झाले. त्यामध्ये ३७७ प्राणांतिक, १,९७४ गंभीर, ९५९ किरकोळ अपघातांचा समावेश आहे. वर्ष २०१९- २० मध्ये एकूण ३,३३७ अपघात झाले. त्यामध्ये ३६० प्राणांतिक, १,५५३ गंभीर, १,४२४ किरकोळ अपघातांचा समावेश आहे. वर्ष २०२०- २१ मध्ये एकूण १,४४४ अपघात झाले. त्यामध्ये ३६० प्राणांतिक, १,५५३ गंभीर, १,४२४ किरकोळ अपघातांचा समावेश आहे. वर्ष २०२१- २२ मध्ये एकूण १,२८१ अपघात झाले. त्यामध्ये १३० प्राणांतिक, ५८३ गंभीर, ५६७ किरकोळ अपघातांचा समावेश आहे. वर्ष २०२२- २३ मध्ये एकूण ३,०१४ अपघात झाले. त्यामध्ये २८३ प्राणांतिक, १,३६९ गंभीर, १,३६२ किरकोळ अपघातांचा समावेश आहे. वर्ष २०२३-२४ (नोव्हेंबर २०२३ पर्यंत) एकूण २,२८६ अपघात झाले. त्यामध्ये २४५ प्राणांतिक, ९९५ गंभीर, १,०४६ किरकोळ अपघातांचा समावेश आहे.
“महामंडळ आर्थिक कोंडीच्या नावावर बसेसचे सुटे भाग वेळेवर देत नाही. महामंडळात अनेक पदे रिक्त आहे. नवीन बसेस वेळेवर मिळत नाही. सेवेवरील कर्मचाऱ्यांवर कामाचा तान वाढत असल्याने एसटीत यंदाच्या वर्षी सर्वाधिक अपघात झालेले दिसत आहे. तातडीने प्रभावी उपाय करून हा प्रश्न सोडवण्याची गरज आहे.”- श्रीरंग बरगे, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस.