नागपूर : उपराजधानीत मेंदूमृत रुग्णाकडून अवयवदान करण्याचा उपक्रम २०१३ मध्ये सुरू झाला. १३ मेपर्यंत नागपूर विभागात मेंदूमृत अवयवदान करणाऱ्यांच्या संख्येने दीडशेचा टप्पा गाठला आहे. त्यापैकी २० अवयवदाते मागील साडेचार महिन्यातील (वर्ष २०२४) आहे. त्यामुळे चालू वर्षाची दानदात्यांच्या उच्चांकाकडे वाटचाल सुरू आहे.
जिनेंद्र जैन (४४) रा. खरबी, नागपूर असे दीडशेव्या दानदात्याचे नाव आहे. जिनेंद्र यांचा पानाचे साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांना ६५ वर्षीय वडील (रमेश जैन), पत्नी (भावना जैन), १६ वर्षीय मुलगा व ८ वर्षीय मुलगी आहे. जिनेंद्र ११ मे रोजी रात्री दुकान बंद करून घराकडे जात होते. पंचशील चौकातून बर्डीकडे येणाऱ्या मार्गात एका चारचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपस्थितांनी त्यांना केअर रुग्णालयात दाखल केले. उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने विविध वैद्यकीय तपासणी केली असता मेंदूमृत झाल्याचे पुढे आले.
हेही वाचा >>>उष्माघाताच्या रुग्णांची लपवाछपवी? नागपुरात रुग्ण नाही, पण तीन संशयित मृत्यू…
नागपुरातील विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या सूचनेवरून रुग्णालयात जैन यांच्या नातेवाईकांचे डॉक्टरांनी समुपदेशन केले. कुटुंबीयांनी होकार दर्शवताच प्रत्यारोपण समितीला सूचना दिली गेली. त्यानंतर रुग्णाच्या अवयवांशी जुळणाऱ्या गरजू रुग्णांचा शोध सुरू झाला. शेवटी एक मूत्रपिंड केअर रुग्णालयातील ४६ वर्षीय पुरुष रुग्णाला, दुसरे मूत्रपिंड ऑरेंज सिटी रुग्णालयातील ३८ वर्षीय पुरुषाला, हृदय मुंबईतील एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयातील ५३ वर्षीय पुरुष रुग्णामध्ये प्रत्यारोपित केले गेले. हृदय मुंबईला विशेष विमानाने ग्रीन कॅरिडोर करून हलवले गेले, हे विशेष. या मेंदूमृत रुग्णाच्या अवयवदानामुळे यंदाच्या अवयवदान करणाऱ्या मेंदूमृत दात्यांची संख्या साडेचार महिन्यातच २० वर पोहचली आहे. तर २०१३ पासूनची आजपर्यंतची दानदात्यांची संख्या बघता ती दीडशेवर पोहचली आहे.
अवयवदानाची स्थिती
नागपूर जिल्ह्यात २०१३ पासून अवयवदानाला सुरुवात झाली. मागील वर्षी २०२३ मध्ये नागपूर विभागात सर्वाधिक ३५ मेंदूमृत रुग्णांकडून अवयवदान झाले. १ जानेवारी २०२४ पासून १५ मे २०२४ पर्यंत नागपूर विभागात एकूण २० मेंदूमृत रुग्णांकडून अवयवदान झाले. चालू वर्षात आणखी साडेसात महिने शिल्लक असल्याने विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीला यंदा अवयव दानाचा नवीन उच्चांक स्थापित होण्याची आशा आहे.