डागा रुग्णालय आणि स्त्रीरोग तज्ज्ञांचे काय आहे निरीक्षण?
महेश बोकडे
नागपूर : करोनापूर्वी ‘सिझेरियन’च्या तुलनेत सामान्य प्रसूती जास्त होत होत्या. परंतु, करोनानंतर ‘सिझेरियन’ प्रसूती वाढल्या आहेत. नागपुरातील डागा स्मृती स्त्री शासकीय रुग्णालयाच्या निरिक्षणातून ही आकडेवारीतून समोर आली आहे.
मध्य भारतात सर्वाधिक प्रसूती डागा रुग्णालयात होतात. येथे नागपूरसह शेजारच्या मध्यप्रदेश, छत्तीसगडचेही रुग्ण येतात. करोनापूर्वी (साधारण चार ते पाच वर्षांपूर्वी) येथे निम्म्याहून जास्त सामान्य व ४५ टक्केच्या जवळपास ‘सिझेरियन’ प्रसूती होत होत्या. परंतु, करोनानंतर हे प्रमाण उलट झाले असून सिझेरियन प्रसूती वाढल्या आहेत. इतरही शासकीय व खासगी रुग्णालयात जवळपास अशीच स्थिती आहे.
सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात याबाबत माहिती मागितली होती. त्यानुसार, १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या वर्षभरात डागामध्ये ९ हजार ४५७ प्रसूती झाल्या. त्यात ४ हजार ९०३ (५१.८४ टक्के) सिझेरियन तर ४ हजार ५५४ सामान्य प्रसूती होत्या. २०२१ मध्ये येथे ११ हजार १६८ प्रसूती झाल्या. त्यात ६ हजार ९२ (५४.५४ टक्के) ‘सिझेरियन’ तर ५ हजार ७६ सामान्य प्रसूती होत्या. २०२२ मध्ये येथे १२ हजार १८२ प्रसूती झाल्या. त्यात ६ हजार ६५३ (५२.३७ टक्के) ‘सिझेरियन’ तर ५ हजार ५२९ सामान्य प्रसूती झाल्या. २०२३ मध्ये जानेवारीत ९९१ प्रसूती झाल्या. त्यात ५१९ (५२.३७ टक्के) सिझेरियन तर ४७२ सामान्य प्रसूती होत्या. त्यातून ‘सिझेरियन’ प्रसूतीचे प्रमाण वाढलेले दिसत आहे.
खासगी रुग्णालयात ‘सिझेरियन’चे प्रमाण ६० टक्के
खासगीत सुमारे ६० टक्के प्रसूती ‘सिझेरियन’द्वारे होतात. त्याला जोखीम स्वीकारण्याचे कमी झालेले प्रमाणही कारणीभूत आहे. प्रत्येकाने नियमित व्यायाम, खानपानाच्या सवयी सुधारणे, लवकर लग्न व बाळांचे नियोजन केल्यास हे चित्र बदलू शकते.- डॉ. सुषमा देशमुख, अध्यक्ष, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञांची संघटना, नागपूर.
महिलांमध्ये खानपानाच्या वाईट सवयी, श्रम कमी झाल्याने प्रसूती वेदना सहन करण्याची क्षमता कमी झाली आहे. दुसरीकडे महिलांचे स्नायू आकुंचन पावत असल्यानेही सिझेरियन वाढले आहे. डागा रुग्णालयात सामान्य प्रसूतीसाठी व्यायामाचा प्रयोग सुरू आहे. त्याचा फायदाही होत आहे. हा प्रयोग सर्वत्र राबवल्यास सामान्य प्रसूतीचे प्रमाण पुन्हा वाढू शकेल.- डॉ. सीमा पारवेकर, वैद्यकीय अधीक्षक, डागा रुग्णालय, नागपूर.