नागपूर : भारतातील बिबट्यांची संख्या आता १३ हजार ८७४ वर पोहोचली आहे. २०१८ ते २०२२ या चार वर्षांच्या तुलनेत त्यात १.०८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी भारतातील बिबट्याच्या सद्यस्थितीबाबतचा अहवाल बुधवारी जाहीर केला.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था यांनी वनविभागाच्या सहकार्याने व्याघ्रश्रेणीतील १८ राज्यांमध्ये बिबट सर्वेक्षण केले. या पाचव्या सर्वेक्षणानुसार, भारतात बिबट्यांची संख्या १३ हजार ८७४ असून २०१८ मध्ये ती १२ हजार ८५२ इतकी होती. हिमालय तसेच वाघांचा अधिवास नसलेल्या अर्ध शुष्क भागात सर्वेक्षण करण्यात आले नाही. मध्य भारतात बिबट्याच्या संख्येत किंचित वाढ दिसून आली. २०१८ मध्ये ८०७१ तर २०२२ मध्ये ८८२० बिबट आढळले. शिवालिक टेकड्या आणि गंगेच्या पठारी भागात मात्र दरवर्षी ३.४ टक्क्यांनी घट दिसून आली. २०१८ मध्ये याठिकाणी १२५३ तर २०२२ मध्ये ११०९ बिबट आढळले. २०१८ आणि २०२२ मध्ये संपूर्ण भारतात केलेल्या सर्वेक्षणाचा विचार केल्यास १.०८ टक्क्यांनी वार्षिक वाढ झाली आहे. आंध्रप्रदेशातील नागार्जुनसागर श्रीशैलम तसेच मध्यप्रदेशातील पन्ना व सातपुडा व्याघ्रप्रकल्पात बिबट्यांची संख्या सर्वाधिक होती. व्याघ्र प्रकल्प महत्त्वाचे असतानाच संरक्षित क्षेत्राबाहेरील संवर्धनातील अंतर दूर करणे तितकेच महत्त्वाचे आहे. संघर्षाच्या वाढत्या घटना बिबट्या आणि समुदाय दोघांसाठी आव्हाने निर्माण करतात. संरक्षित क्षेत्राबाहेर बिबट्यांचे अस्तित्व तितकेच महत्त्वाचे असल्याने, अधिवास संरक्षण वाढवण्यासाठी आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सरकारी संस्था, संवर्धन संस्था आणि स्थानिक समुदाय यांचा समावेश असलेले प्रयत्न आवश्यक आहेत, असे निरीक्षणदेखील या अहवालात नोंदवण्यात आले आहे.
हेही वाचा >>>आमदार गायकवाडांविरुद्धचे शुक्लकाष्ठ थांबेना….पुन्हा नवीन गुन्हा दाखल
बिबट्यांच्या संख्येचे मूल्यांकन करण्यासाठी वैज्ञानिक पद्धत व तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. सहा लाख ४१ हजार ४४९ किलोमीटर पसरलेल्या भूप्रदेशात पायी फिरून सर्वेक्षण करण्यात आले. तसेच ३२ हजार ८०३ ठिकाणांवर कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले होते.
व्याघ्रप्रकल्पाच्या संवर्धनाचा वारसा आता वाघांच्याही पलीकडे विस्तारला आहे, हे बिबट्याच्या सद्यस्थिती अहवालातून स्पष्ट होत आहे. व्याघ्रप्रकल्पाच्या सर्वसमावेशक दृष्टिकोनातून जैवसंस्थेचे परस्परसंबंध आणि वैविध्यपूर्ण प्रजातींचे संरक्षण केले जात आहे.- भूपेंद्र यादव, केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्री.
राज्य, वर्ष व बिबटयांची संख्या
२०१८ – २०२२
मध्यप्रदेश – ३४२१ – ३९०७
महाराष्ट्र – १६९० – १९८५
कर्नाटक – १७८३ – १८७९
तामिळनाडू – ८६८ – १०७०