नागपूर : राज्यातील कारागृहांत कैद्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कारागृंहाच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या अधिकारी आणि सुरक्षारक्षकांची संख्या कमी आहे. राज्य कारागृह विभागात जवळपास ४० टक्के पदे रिक्ते असून उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांवर सुरक्षेचा ताण वाढला आहे. राज्यात ६ हजार ६८ सुरक्षारक्षकांची पदे मंजूर असून प्रत्यक्षात मात्र ३ हजार ६८२ सुरक्षारक्षकच तैनात आहेत, अशी माहिती पुणे महासंचालक कार्यालयातून मिळाली आहे.

राज्यातील प्रत्येक कारागृहात क्षमतेपेक्षा दीडपट ते दुप्पट कैदी कोंबल्या जात आहेत. तसेच राज्यातील अनेक कारागृहात कैद्यांमध्ये वाद आणि हाणामारीच्या घटना समोर येत आहेत. कैद्यांवर नियंत्रण ठेवणे किंवा त्यांना शिस्त लावण्यासाठी मोठा ताफा तैनात करावा लागतो. मात्र, राज्य कारागृहात जवळपास ४० टक्के पदे रिक्त असून उपलब्ध असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. कमी मनुष्यबळात क्षमतेपेक्षा जास्त असलेल्या कैद्यांचा ताण कारागृह प्रशासनावर पडत आहे. राज्यात नऊ मध्यवर्ती, २८ जिल्हा, १९ खुली व इतर अशी एकूण ६० कारागृहे आहेत. या कारागृहांची क्षमता २४ हजार असताना कारागृहात सध्या ३९ हजारांवर कैदी आहेत. कारागृहात क्षमतेपेक्षा कैदी जास्त आहेत. राज्य कारागृह विभागासाठी ७ हजार ६८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ४ हजार ३२८ पदे कार्यरत आहेत. अजुनही
२७४० पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. मध्यवर्ती कारागृह अधीक्षक व जिल्हा कारागृह अधीक्षकांची पदेसुद्धा रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच प्रत्यक्ष कारागृहात कामाची अंमलबजावणी करणारे रक्षकांची २३८५ पदे भरली नसल्याचे समोर आले आहे. कारागृहात सुरक्षाव्यवस्थेसह अन्य कामांची वाढता ताण बघता कारागृहाची प्रशासन व्यवस्थेला मोठे खिंडार पडल्याचे चित्र आहे. अनेक कारागृहात तुरुंगाधिकारी नसल्यामुळे उपलब्ध अधिकाऱ्यांवर अनेक विभागाचा प्रभार देण्यात येत आहे. यामुळे कारागृह प्रशासन व्यवस्था खिळखिळी झाल्याचे दिसते.

तुरुंगाधिकाऱ्यांची पदे रिक्त

राज्यात तुरुंगाधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया २०१४ पासून बंद असून राज्यात तुरुंगाधिकाऱ्यांची जवळपास ३०० पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. तसेच कारागृहांची संख्याही वाढविण्याची गरज आहे. कारागृह विभागात तांत्रिक विभाग असून त्यात कैद्यांचे आरोग्य सांभाळणारे डॉक्टर, परिचालक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वस्रोद्योग, तरूंग उद्योग अधीक्षक, कृषी सहायक अशी जवजवळ २० प्रकारची पदे आहेत. मात्र, जवळपास ३९ टक्के पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.

कारागृहात सुरक्षारक्षकांची पदे रिक्त आहेत. सुरक्षारक्षकांच्या १८०० पदांची भरती प्रक्रिया सुरु आहे. तसेच तांत्रिक पदे आणि लिपिकांच्या पदाची भरती प्रक्रिया सुरु आहे. येत्या काही सहा महिन्यांत पदभरतीची प्रक्रिया पूर्ण होईल. – डॉ. जालिंदर सुपेकर (विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य कारागृह विभाग)