गोंदिया : ओबीसी आणि मराठा वाद हा सरकारनिर्मित आहे. सरकारकडून हा वाद मुद्दाम घडवून जनतेच्या मूळ प्रश्नांना बगल देण्याचे काम केले जात आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. काँग्रेसला या वादात पडायचे नाही. राज्यात आणि देशात महागाई, बेरोजगारीसारखे ज्वलंत प्रश्न असताना त्याकडे कोणाचे लक्ष नाही. मूळ मुद्यावर लक्ष केंद्रित करून सरकारला ते मुद्दे सोडवायला भाग पाडण्याचे काम काँग्रेस करणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथे जिल्हा महिला मेळाव्यासाठी आले असता ते माध्यमांशी बोलत होते. मंत्री छगन भुजबळ यांचे नाभिक समाजाबाबतचे वक्तव्य संवैधानिक व्यवस्थेचा अपमान करणारे आहे. नाभिक समाज महत्त्वपूर्ण घटक असून त्या समाजाचा कोणी अपमान करत असेल तर, त्याचा आम्ही निषेध करतो. सरकारनेदेखील या संदर्भात गांभीर्याने लक्ष घालून कारवाई करायला हवी. या सरकारने जनाची नाही तर मनाची लाज बाळगावी, अशा शब्दात पटोले यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या व्यक्तव्याचा समाचार घेत सरकारवरही घणाघात केला.
हेही वाचा – महात्मा जोतीराव फुले यांना भारतरत्न कशाला? छगन भुजबळ स्पष्टच म्हणाले…
हेही वाचा – “माझ्या नॅपकिनमध्ये जादू आहे, ती…”, उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला भरत गोगावलेंचं उत्तर
‘मतांच्या राजकारणासाठी सत्ताधाऱ्यांकडून रामनामाचा गजर’
मतांच्या राजकारणासाठी सत्ताधाऱ्यांकडून श्रीरामनामाचा मतलबी गजर सुरू आहे. भगवान श्रीराम आमच्या हृदयात आहेत, जेव्हा महात्मा गांधींची हत्या झाली, तेव्हा गांधीजींनी ‘हे राम’ हे शब्द उच्चारूनच आपला देह सोडला. एकीकडे महागाई, बेरोजगारी आकाशाला भिडली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून देशात आणि राज्यात सत्ताधाऱ्यांच्या आमदार व खासदारांकडून महिलांवर अत्याचार वाढत आहेत भरदिवसा गोळीबार, गुंडगिरी माजवून सामान्यांना छळले जात आहे, असा आरोप नाना पटोले यांनी अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती महाविद्यालयात रविवारी आयोजित जिल्हा काँग्रेस महिला मेळाव्याला संबोधित करताना केला.