नागपूर: राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी- कर्मचाऱ्यांचा स्थायी करण्याच्या मागणीसाठीचा संप निकाली निघण्याचे नाव घेत नाही. मंगळवारी या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी नागपुरातील दीक्षाभूमी ते संविधान चौक मार्च काढत सरकारच्या विरोधात निदर्शने केली. संपामुळे हे कर्मचारी सेवा देणाऱ्या रुग्णालयातील रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे.
आंदोलकांच्या माहितीनुसार, ओडिशा, पंजाब, राजस्थान, मणिपूरसह इतर काही राज्यांमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांना तेथील शासनाने स्थायी केले आहे. महाराष्ट्रातही या अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचे आश्वासन दिले गेले. परंतु, काहीही केले जात नाही. त्यामुळे २५ ऑक्टोंबरपासून नागपूरसह राज्यातील कंत्राटी अधिकारी- कर्मचारी संपावर गेले आहे.
सरकारसोबत एकदा चर्चा झाल्यावर ३० टक्के जणांना स्थाईचे आमिष दाखवले गेले. परंतु सगळ्यांना सरसकट स्थाची माहिती नसल्याने ही मागणी पूर्ण होईस्तोवर माघार नसल्याचे सांगत आंदोलकांनी नागपुरातील दीक्षाभूमी चौकातून संविधान चौकापर्यंत सकाळी मार्च काढला. त्यानंतर संविधान चौकात धरणे आंदोलन सुरू आहे. शासनाने स्थायी न केल्यास आंदोलन आणखी तिव्र करण्याचा इशाराही यावेळी दिला गेला.