नागपूर : माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गाजावाजा करीत सुरू केलेल्या ‘ ऑपरेशन टायगर’ ला विदर्भात प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.शिंदे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने पक्ष प्रवेश सोहळे घडवून आणले जातात, पण त्यात एकाही मोठ्या नेत्याचा विशेषत: उद्धव ठाकरे गटातील बड्या नेत्याचा पक्ष प्रवेश होत नाही. दोन महिन्यापूर्वी नागपूरमध्ये हेच घडले होते. गुरूवारी शिंदे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तेथेही ‘ऑपरेशन टायगर ’ घडवून आणले जाईल, असे चित्र निर्माण करण्यात आले. प्रत्यक्षात ठाकरे गटाचे फक्त दोन उपजिल्हा प्रमुख तेवढे शिंदे यांच्या गळाला लागले.
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेला चांगले यश मिळाले. तेव्हापासून शिंदे सेनेची हिंमत वाढली. सत्तेतील सहभाग व भाजपची साथ या जोरावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला खिंडार पाडण्याचे प्रयत्न शिंदे सेनेने सुरू केले. ‘ ऑपरेशन टायगर’ असे त्याला नाव देण्यात आले आणि राज्यातील विविध भागात ते राबवण्यासाठी प्रयत्न झाले. फार प्रभाव नसलेल्या विदर्भातही याबाबत चाचपणी सुरू झाली. शिंदे सेनेचे विदर्भातील मंत्री आशीष जयस्वाल यांनीही याबाबत सुतोवाच करून वातावरण निर्मितीला सुरूवात केली. त्यांचे लक्ष विदर्भातील ठाकरे गटाचे आमदार आणि खासदार होते. अनेक प्रयत्न करूनही शिंदे सेनेला यात यश आले नाही. उद्धव ठाकरे गटाच्या काही जिल्हास्थरीय पदाधिकाऱ्यांचा अपवाद सोडला तर शिंदे सेनेत जाण्यास कट्टर शिवसैनिकांनी नकारच दिल्याची माहिती आहे. त्यामुळेच शिंदे सेनेचे ऑपरेशन टायगर या भागात जोर धरू शकले नाही, असे ठाकरे गटाच्या नत्याने सांगितले.
जे नागपुरात तेच यवतमाळात
दोन महिन्यापूर्वी शिंदे नागपूरला येऊन गेले.त्यावेळी ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख राजू हरणे यांचा अपवाद सोडला तर ठाकरे गटाच्या एकही बड्या नेत्याने शिंदे गटात प्रवेश केला नाही. उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडायला निघालेल्या शिंदे यांना मगइतर पक्षाच्या नेत्यांना पक्षात प्रवेश द्यावा लागला. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या मनसेलाच धक्का देत या पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर सरायकर यांना पक्षात प्रवेश दिला. शिंदे मोठे ऑपरेशन नागपुरात करणार असा दावा केला जात होता तो त्यावेळी फोल ठरला होता. असाच दावा गुरूवारी शिंदे यांच्या यवतमाळ दौऱ्याच्या वेळी करण्यात आला होता. शिंदे हे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस मतदारसंमघाचे आमदार व राज्याचे मंत्री संजय राठोड यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी आले होते. या निमित्ताने शिंदे ऑपरेशन टायगर करणार अशी चर्चा शिंदेगटाकडून संपूर्ण जिल्ह्यात घडवून आणली होती. प्रत्यक्षात शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या दोन उपजिल्हा प्रमुख आणि एका तालुका प्रमुखानेच प्रवेश केला. एकही बडा नेता त्यांच्या गळाला लागला नाही.
बाहेरून आलेल्यांची उपेक्षा
शिंदे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने पक्ष प्रवेश घडवून आणले जातात, येणाऱ्यांना अनेक आश्वासने दिली जातात,पण नंतर ती पाळल्या जात नाही, असे दिसून आले आहे. नागपूरमध्ये पक्ष प्रवेश झाल्यानंतर मनसे व इतर पदाधिकाऱ्यांना दोन दिवसात नियुक्ती पत्रे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु ते पाळले गेले नसल्याची माहिती आहे.