नागपूर : हल्ली वातावरणातील बदलामुळे घरोघरी डोळे येण्यासह घश्याचा त्रास असलेले रुग्ण वाढत आहे. घश्याच्या खवखवीमुळे ऑफीसला गेलो किंवा कुठे बाहेर गेलो तरी उगाचच आजारी असल्याचे वाटते. बोलताना, खाताना त्रास होतो. इतक्या लहान तक्रारीसाठी डॉक्टरांकडे कशाला जायचे म्हणून आपण ती गोष्ट अंगावर कढतो. पण असे अंगावर काढल्यास त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे या समस्येसाठी काही घरगुती उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. हे घरगुती उपाय कोणते? जाणून घेऊया.
नागपुरातील मेडिकल- मेयो रुग्णालयात सध्या घशाचा त्रास घेऊन रोज तीनशेच्या जवळपास रुग्ण येत आहेत. खासगीतही हे रुग्ण वाढले आहे. घशातील खवखवी दूर करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून अनेकांकडे केल्या जाणाऱ्या घरगुती उपायानुसार वाफ घेणे फायद्याचे आहे. वातावरणातील बदलामुळे घशाचे इन्फेक्शन होणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. याच्या जोडीला येणारा ताप, सर्दी यामुळे आपण हैराण होऊन जातो. पण वाफ घेणे हा यावरील सोपा उपाय आहे. घरच्या घरी गरम पाणी करून त्याची वाफ घेतल्यास घशाला आराम पडतो. दिवसातून दोन ते तीन वेळा हे केल्यास इन्फेक्शन कमी व्हायला मदत होते.
हेही वाचा – डाेळे येऊ नये म्हणून घरातच करा हा साधा उपाय, काय आहे आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला?
दरम्यान डॉक्टरांकडे गेल्यास ते रुग्णाला औषधांबरोबरच गुळण्या करायला लावतात. कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या केल्याने त्याचा निश्चित फायदा होतो. इतकेच नाही तर ऑफीसमध्ये किंवा बाहेर असल्यास कोमट पाणी आणि मीठ शक्य नसले तर साध्या पाण्याने गुळण्या कराव्यात. त्यामुळे घसा मोकळा व्हायला मदत होते. हा त्रास असलेल्या काळात घसा दुखत असल्यास काहीतरी गरम पिण्याची इच्छा होते. अशावेळी गरम चहा, मिर्याचा चहा, कॉफी, प्रतिकारक शक्ती वाढवणारे आयुर्वेदिक काढे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किंवा सूप प्यायल्यास त्याचा निश्चित फायदा होतो. चहामध्ये तुळस, लवंग, आले घातल्यास घशासाठी तो जास्त उपयुक्त होतो. असा चहा दिवसातून २ वेळा घेतला तरी घशाला आराम मिळतो, अशी माहिती भाऊसाहेब मुळक आयुर्वेदिक कॉलेज आणि रुग्णालय, बुटीबोरीचे उपप्राचार्य डॉ. मोहन येंडे यांनी दिली.