वर्धा मार्गावरील डबल डेकर उड्डाणपुलावरील विद्युत खांबावर लावलेले फलक लोंबकळत असल्याने ते पुलावरून जाणाऱ्या वाहनांवर कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे हे फलक तातडीने काढण्याची मगाणी करण्यात येत आहे. मंत्री नारायण राणेंच्या दौऱ्यादरम्यान त्यांच्या कार्यक्रमाची माहिती देणारे फलक पूलावर लावण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- दूषित पाणी प्यायल्याने गावकऱ्यांना अतिसाराची लागण; १०० पेक्षा अधिक बाधित

काही दिवसांपूर्वी केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग खात्याचे मंत्री नारायण राणे यांचा नुकताच नागपूर मार्गे वर्धा दौरा पार पडला. त्यांच्या आगमनाच्या निमित्ताने वर्धा मार्गावरील डबल डेकर उड्डाणपुलावरील विद्युत खांबांवर त्यांच्या कार्यक्रमाची माहिती देणारे फलक पुलाच्या दोन्ही बाजूंनी लावण्यात आले. त्यातील काही रस्त्याच्या बाजूने झुकले आहेत. ते केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. धावत्या वाहनांवर ते कोसळले तर अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे ते तातडीने काढण्याची गरज या मार्गावरून नियमित जाणाऱ्या दुचाकीस्वारांनी व्यक्त केली. मेट्रोच्या खांबांवर जाहिराती, स्वागत फलक लावण्यास महामेट्रोने मनाई केली आहे. यापूर्वी ज्यांनी लावले त्यांच्याविरुद्ध महामेट्रो प्रशासनाने पोलिसांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. मात्र हे फलक मेट्रो खांबावर न लावलात त्यावरील विद्युत खांबावर लावण्यात आले आहेत. तरीही महामेट्रो प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली असून हे फलक तातडीने काढण्यासाठी पावले उचलली जाणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The panels on the double decker flyovers on wardha marg are in a dangerous condition dpj