अकोला: शिवणी विमानतळाचा प्रलंबित प्रश्न आता उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या कोर्टात गेला आहे. हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी आमदार वसंत खंडेलवाल यांनी शुक्रवारी अजित पवारांची भेट घेऊन विमानतळासाठी निधी उपलब्ध करून देण्याची गळ घातली आहे. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत हा विषय लवकरच आढावा बैठकीत घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशन काळात विविध प्रश्न मार्गी लावून घेण्याची धडपड आमदारांकडून सुरू आहे. पश्चिम विदर्भासाठी अत्यंत उपयुक्त अकोल्यातील शिवणी विमानतळाचा विषय गत अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या विमानतळाच्या विस्तारित धावपट्टीसाठी आमदार खंडेलवाल यांनी दिल्ली- मुंबईत स्थानिक अधिकाऱ्यांना घेऊन अनेक बैठका घेतल्या.
हेही वाचा… महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे पीएचडीचे विद्यार्थी निलंबित, कारण काय वाचा…
शुक्रवारी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची शासकीय निवासस्थानी भेट घेऊन विमानतळासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. हा विषय मार्गी लावण्यासाठी निवेदन देऊन चर्चा केली. या मागणीचा विषय आढावा बैठकीत येण्यात येईल, असे अजित पवारांनी आश्वस्त केले. अन्य काही विकासाच्या प्रकल्पांवरही आमदार खंडेलवाल यांनी अजित पवारांशी चर्चा केली. खंडेलवाल यांनी मांडलेले सर्व मुद्दे ऐकून घेत हे विषय मार्गी लावण्याचे आश्वासनही अजित पवारांनी दिले. यावेळी भाजपचे प्रतुल हातवळणे उपस्थित होते.