गडचिरोली : पायाभूत सुविधांची वानवा, नक्षलग्रस्त व मागास अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल १३ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून पशुधन विकास अधिकारी पदाला गवसणी घातली आहे. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाचवेळी इतक्या संख्येने विद्यार्थ्यांची ‘एमपीएससीत’ निवड झाल्याने शिक्षण क्षेत्रातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पशुधन विकास अधिकारी या पदासाठी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला आहे. उत्तीर्ण झालेल्या २९३ उमेदवारांमध्ये तब्बल १३ उमेदवार हे गडचिरोली जिल्ह्यातील आहेत. यात आरमोरी तालुक्यातील ६,वडसा तालुक्यातील ३, गडचिरोली तालुक्यातील २, चामोर्शी तालुक्यातील १ आणि अहेरी तालुक्यातील १ असे ४ मुली आणि ९ मुले एकूण १३ जणांचा समावेश आहे. या सर्वांनी २२ डिसेंबर २०२२ मध्ये एमपीएससी परीक्षा दिली.५ सप्टेंबर २०२३ रोजी मुलाखत झाली आणि त्याचा निकाल २० ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारच्या सुमारास जाहीर झाला. त्यात तब्बल १३ जणांना घवघवित यश मिळालं. आता हे सर्व तरुण तरुणी विविध ठिकाणी पशुधन विकास अधिकारी म्हणून सेवा देणार आहे.
हेही वाचा – नागपुरात दागिने निर्मिती हब झाल्यास अलंकार व्यवसायाला ‘बुस्ट’, सराफा व्यावसायिकांचे मत
हेही वाचा – बुलडाणा जिल्हा बँकेला दोन ‘एफसीबीए’ पुरस्कार, राष्ट्रीय सहकार परिषदेत झाला सन्मान
निवड झालेले विद्यार्थी
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये डॉ. चेतन अलोने रा.अहेरी डॉ.शुभम राऊत, डॉ. निशिगंधा नैताम, डॉ. शुभम नैताम, डॉ. श्रुती गणवीर, डॉ. अंशुल बोरकर, डॉ. प्रज्ञा दिवटे (सर्व रा.आरमोरी), डॉ. जयंत सुखरे रा. वडसा, डॉ. अक्षय लाडे रा. वडसा, डॉ. मनोज दोनाडकार रा. तुळशी ता. वडसा, डॉ. हर्षल बोकडे रा. गडचिरोली, डॉ. आशिष भोयर रा. गडचिरोली, डॉ. मीनल सोनटक्के रा. घोट ता. चामोर्शी यांचा समावेश आहे.