वाशिम : नगर पालिकेच्यावतीने शहरातील अकोला नाका परिसरातील टेंपल गार्डनमध्ये कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या तारांगणाला आग लागल्याने कोट्यवधी रुपयांचे साहित्य जाळून राख झाले. ही घटना आज, मंगळवारी घडली. सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत असतानाही आग कशी लागली, यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत.
विद्यार्थ्यांसह नागरिकांना अंतराळातील घडामोडींची माहिती व्हावी तसेच नव्या तंत्रज्ञानाची अद्ययावत माहिती मिळावी, यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून तारांगण उभारण्यात आले होते. मात्र, ते गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत होते. त्यासाठी विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी आंदोलने करून तारांगण सुरू करण्याची मागणी केली होती. काही महिन्यांपूर्वी टेंपल गार्डन नागरिकांसाठी खुले करण्यात आले होते. परंतु तारांगण बंदच होते. आमदार लखन मलिक यांनी भेट देऊन नाराजी व्यक्त केली होती. कोट्यवधी रुपयांचे साहित्य धूळखात पडून होते. मंगळवारी सकाळी अचानक तारांगणात आग लागल्याची माहिती मिळताच अग्नीशमन दलाची गाडी तेथे पोहोचली. मात्र तोपर्यंत कोट्यवधी रुपयांचे साहित्य जाळून राख झाले होते. यात अंदाजे २ कोटी ४६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा – वर्धा: आदिवासी आश्रमशाळेत मुलींचा विनयभंग?
हेही वाचा – चंद्रपूर : कुस्तीपटूचा नदीत बुडून मृत्यू, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली होती निवड
अज्ञाताविरोधात गुन्हा
तारांगणात वीज पुरवठा नसल्याने तसेच सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने ही आग लागली नसून लावल्या गेली, असा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती नगर पालिकेचे मुख्याधिकारी निलेश गायकवाड यांनी दिली.