सणासुदीत काही विक्रेते मोठा नफा कमावण्यासाठी अन्नपदार्थांची सर्रास भेसळ करतात. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य सांभाळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठानांवर छापा मारला. यावेळी भेसळयुक्त अन्नाच्या संशयातून २०.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त करून त्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले गेले.
हेही वाचा >>>नागपूर : कुलगुरूंचा न्यायालयात माफीनामा !, डॉ. काशीकर प्रकरणी चपराक
छापा मारलेल्या प्रतिष्ठानांमध्ये खाद्यतेल, वनस्पती, खवा-मावा, रवा, मैदा, बेसन इत्याही अन्नपदार्थांची विक्री होत होती. हे पदार्थ मिठाई आदी बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येतात. सणासुदीत मिठाईला मागणी वाढत असल्याने या पदार्थांमध्ये भेसळ करून काही विक्रेते मोठी कमाई करतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न बघता ‘एफडीए’चे अधिकारी जिल्ह्यात आता सक्रिय झाले आहे. त्यांनी विविध प्रतिष्ठानांवर छापेमारी सुरू करण्यासह तपासणी मोहीमही सुरू केली आहे. ही कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे ‘एफडीए’चे म्हणणे आहे.
हेही वाचा >>>नागपूर : जेरबंद बिबट्याने घेतला मोकळा श्वास
दरम्यान, आजपर्यंत झालेल्या छापेमारीत ‘एफडीए’च्या पथकांनी खवा-मावाचे १० नमुने, मिठाईचे ५५ नमुने, नमकिन-फरसाणचे १६ नमुने, खाद्यतेलाचे ६३ नमुने, तूप-वनस्पतीचे ७ नमुने, रवा, मैदा, बेसन इत्यादींसह इतर अन्नपदार्थांचे ३० नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहे. त्याच्या अहवालानंतर संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. तर या काळात खाद्यतेल पॅकिंगकरिता टिनाच्या डब्यांचा पुनर्वापर करणारे रिपॅकर इत्यादींवर १६ छापे मारून १० हजार ८८२.८५ किलो वजनाचा १७ लाख ९४ हजार ६७१ रुपयांचा भेसळीच्या संशयावरून मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर दोन ठिकाणी ‘डेसिकेटेड कोकोनट पावडर’च्या १ हजार ३६७ किलो वजनाचा २ लाख १३ हजार ९२८ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
हेही वाचा >>>नागपूर : अजित पारसेची रोखे बाजारात कोट्यवधींची गुंतवणूक
सणासुदीत खाद्यपदार्थांत भेसळीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्राहकांनी प्रत्येक मिठाई, नमकीनचे देयक घेणे, पदार्थांच्या पॅकिंगवर उत्पादन व मुदतीची तारीख बघण्याची खातरजमा करूनच पदार्थ खरेदी करावे. ग्राहकांना काही समस्या असल्यास १८८८४६३६३३२ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी. संबंधितांवर कारवाई केली जाईल. तुर्तास जिल्ह्यात सर्वत्र तपासणी अभियान सुरू करून आजपर्यंत २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे, असे अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त डॉ. सु. गं. अन्नपुरे यांनी सांगितले.