गोंदिया: आज पोळा सण श्रावण अमावस्या व भाद्रपद अमावस्या या दोन अमावस्या बैलपोळा म्हणून ओळखला जातो. बैलपोळा, नंदीपोला आणि बेंदूर, असे लोकसंस्कृतीत तीन वेगवेगळे प्रकार आहेत. नंदी किंवा नंदीबैल पुजनिय असतो. कारण, तो शिवाचे वाहन आहे. शिवाचे वाहन असणारा नंदी हा पुढे मार्तंड भैरव रुपात खंडोबाचे वाहन घोडा झाला. म्हणून पोळ्याला बैलांची पुजा करण्यात येते. ग्रामीण भागातील बळीराजा अंगावर फाटकी बनियान, नाणे उसने घेवून आपल्या ‘सर्जा राजा’ चा साजश्रृंगार करण्यासाठी सज्ज झाला आहे.
शेतकऱ्यांचे वैभव असलेल्या बैलाचा दिवस म्हणजे पोळा होय. पोळयास बैलपोळा असे देखील म्हणतात. पोळा श्रावण अमावस्या या तिथीला साजरा करण्यात येतो. बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. ज्यांचेकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. शेतीप्रधान या देशात व शेतकऱ्यांत या सणाला विशेष महत्त्व आहे.
हेही वाचा… पोळ्याचा उत्साह वाढता, पण बैलजोड्याची संख्या दरवर्षी घटती… कारण काय…
या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो. शेतात पीक डौलात असतात. सगळीकडे हिरवळ असते. श्रावणातले सण संपत आलेले असतात. एकूणच आनंदाचे वातावरण असते. मात्र दिवसेंदिवस होणा-या नापिकीमुळे व खालावणाऱ्या आर्थिक परिस्थितीमुळे पोळयाचा उत्साह कमी होत आहे. पोळयाच्या दिवशी ग्रामीण भागात झडत्यांना विशेष महत्व आहे. ढोल ताशाच्या गजरात शेतक-यानी हनुमंताच्या मंदिराच्या समोर बैल आणले की झडत्यांच्या सामन्याला सुरुवात होते. ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी म्हटल्या जाणाऱ्या झडत्यातून सर्वसामान्य शेतकऱ्याची परिस्थिती विशद होते. एक दुसऱ्यावर मात करुन झडतीद्वारे आनंद घेतला जातो.
हेही वाचा… सायबर गुन्हेगार सक्रिय; ‘रेकॉर्डेड कॉल’वरून फसवणूक
पोळाच्या आदल्या दिवशी वर्षभर राबणाऱ्या बैलांचे खांदे शेकणीचा कार्यक्रम असतो. पण दरवर्षीं वाढतच जाणारी महागाई शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत आहे. अश्या असंख्य झडतीनंतर एक रांगेत उभे असलेल्या बैलांच्या जोडीची पूजा केली जाते. त्या नंतर तोरण तोडल्या जाते आणि पोळा फुटतो, शांत संयमी बैलांच्या जोडया त्यानंतर सुसाट वेगाने निघतात आणि आपल्या धन्याच्या घरी मानाची पूजा घेण्यासाठी पळतात. पोळा पाहण्यासाठी आलेले नागरिकही घरी गेल्यावर जोडीची पूजा करुन बैलजोडीला नवैद्य दाखवितात. परंपरागत पध्दतीने साजरा होणारा पोळा शहरी भागातील नागरिकासाठी काहीसा निरस ठरणारा असला तरी ग्रामीण भागात मात्र पोळयाचा उत्साह आज ही कायम आहे.
हेही वाचा… वाघाने जिल्हा सोडला पण डरकाळ्या सुरूच; शाळा ओस तर वन कर्मचारी त्रस्त
शेतकरी पोळयात एकमेकांना अक्षदांचा टिका कपाळाला लावून आलींगन देऊन स्नेहभाव प्रकट करता. पूर्वीच्या काळी पाटलाची बैलजोडी वाजत गाजत निघत असे मात्र आता पाटलांची बैलजोडी गेली. या पारंपारिक सणांचे स्वरुपही बदलत असले तरी ग्रामीणभागात पोळयाच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती आजही कायम आहे हे मात्र खरे.