नागपूर : मध्यरात्री दीड वाजता पती-पत्नीत वाद झाला. पत्नीने दाराची कडी लावून पंख्याला ओढनीने गळफास घेण्याची तयारी केली. मात्र, यादरम्यान गस्तीवर असलेल्या दोन बीट मार्शल पोलीस कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली. पोलिसांनी सतर्कता दाखवत महिलेच्या घराचा दरवाजा तोडून नुकताच गळफास लावलेल्या महिलेचे प्राण वाचवले.युवराज कावळे आणि पंकज यादव असे महिलेचा जीव वाचविणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
रूपाली (काल्पनिक नाव) ही महिला पती व दीड वर्षाच्या मुलसह कळमन्यात राहते. तिचा पती गेल्या काही महिन्यांपासून कामावर जात नव्हता. त्यामुळे घरखर्चही भागत नव्हता. त्यातच पतीने काही कर्जही घेतले होते. घरातील आर्थिक स्थिती योग्य नसल्यामुळे पती-पत्नीत नेहमी वाद होत होते. शनिवारी रात्री दीड वाजता पती-पत्नीत वाद झाला. तिने आत्महत्या करण्याची धमकी दिली.
घराचे दार लावून घेतले आणि छताच्या पंख्याला ओढनी बांधायला लागली. खिडकीतून हा प्रकार बघून पतीने आरडाओरड केली. शेजाऱ्यांनीही मदतीसाठी धाव घेतली. एका युवकाने कळमना ठाण्यात फोन करून माहिती दिली. त्यादरम्यान वस्तीत रात्रगस्त घालणारे बीटमार्शल पंकज यादव आणि युवराज कावळे यांना माहिती देण्यात आली. दोघांनीही त्वरेने घटनास्थळ गाठले. पोलिसांनी दरवाजा तोडला. आतमध्ये रुपाली हिने गळफास गळ्यात घालून उडी मारण्याच्या तयारी होती. याचदरम्यान दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला अलगत झेलले. एकाने पाय डोक्यावर पकडून ठेवले तर दुसऱ्याने ओढनी विळ्याने कापली. अशाप्रकारे रुपालीचा जीव पोलिसांच्या सतर्कतेने वाचला. कळमना पोलिसांनी महिला व तिच्या पतीचे समूपदेशन केले. त्यानंतर दोघांनाही घरी पाठवले.